आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा संघर्ष पेटणार

By Admin | Updated: March 27, 2015 01:57 IST2015-03-27T01:57:30+5:302015-03-27T01:57:30+5:30

महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे.

The struggle for Ambedkar's birth centenary memorial will start | आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा संघर्ष पेटणार

आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा संघर्ष पेटणार

नागपूर : महापालिकेच्या उदासिनतेमुळे गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठीचा प्रश्न आणखी पेटणार आहे. या स्मारकासाठी मागील २२ वर्षांपासून विविध आंबेडकरी संघटना संघर्ष करीत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या स्मारक संघर्ष समितीने येत्या १४ एप्रिलपर्यंत स्मारकाचा मुद्दा न सुटल्यास जागा ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्यावर समिती ठाम असून १४ एप्रिलला स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
धंतोली येथील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक उभारण्याची घोषणा महापालिकेने २२ वर्षांपूर्वी केली होती. त्यानंतर दरवर्षी महापलिकेच्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी निधीची तरतूदसुद्धा केली जात होती, परंतु स्मारकाचे काम मात्र सुरू झाले नाही. सध्या महापालिकेच्या जागेच्या लीजच्या नूतनीकरणाचा प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. असे असले तरी आतापर्यंत अनेकदा आंबेडकरी जनतेने स्मारकाच्या निर्मितीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलने केली, मात्र महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष आहे. महापालिकेच्या जागेवर ज्याप्रमाणे श्रमिक पत्रकार भवन, शासकीय ग्रंथालय, यशवंत स्टेडियमवरील दुकाने, स्टार बस इत्यादीसाठीची जागा उपलब्ध आहे तर स्मारकासाठीच जागा उपलब्ध का करून दिली जात नाही, असा प्रश्न आंबेडकरी जनतेद्वारा विचारला जात आहे. तसेच या प्रश्नावर आंबेडकरी नेते गप्प असल्याबद्दलसुद्धा आंबेडकरी जनतेमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.
यासंदर्भात डॉ. बाबसाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक संघर्ष समितीचे दिनेश अंडरसहारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जन्मशताब्दी स्मारकासाठी आजवर सनदशीर मार्गानेच लढा देत आहोत. महापौर, मुख्यमंत्री सर्वांनाच भेटून झाले. आंबेडकरी जनता ही कायद्यानुसार चालणारी आहे. आजवर आम्ही कायद्यानुसारच मागणी रेटून धरली. १४ तारखेलासुद्धा आम्ही सनदशीर मार्गानेच आंदोलन करणार आहोत. त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनीसुद्धा हा विषय लावून धरला आहे. यासंबंधात ते म्हणाले की, भाजपातर्फे राज्यात सत्ता आल्यास आम्ही हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले जात होते.
आता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. तेव्हा हा प्रश्न सोडविण्यात कुठली अडचण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत नागपूरचे असून त्यांना या विषयाची चांगली जाण आहे. तेव्हा त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लीजचा प्रश्न राज्य शसनाकडे प्रलंबित असल्याने आंबेडकरी जनतेच्यावतीने पुन्हा एकदा संयुक्त शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: The struggle for Ambedkar's birth centenary memorial will start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.