कडाक्याचे ऊन अन् छत हिरावले

By Admin | Updated: May 22, 2015 02:45 IST2015-05-22T02:45:57+5:302015-05-22T02:45:57+5:30

एकीकडे उन्हामुळे नागरिकांनी दिवसभर घराबाहेर पडणे बंद केले असताना दुसरीकडे लकडगंज परिसरातील घासबजार झोपडपट्टीवासीयांचे डोक्यावरचे छत महापालिकेने हिरावले.

Strike the wool and the roof | कडाक्याचे ऊन अन् छत हिरावले

कडाक्याचे ऊन अन् छत हिरावले

मनपाने तोडली घासबजार झोपडपट्टी : १५० संसार उघड्यावर
नागपूर : ‘मे हीट’ने जोर धरला आहे. सूर्य आग ओकतो आहे. पारा ४७ अंशावर पोहोचला आहे. एकीकडे उन्हामुळे नागरिकांनी दिवसभर घराबाहेर पडणे बंद केले असताना दुसरीकडे लकडगंज परिसरातील घासबजार झोपडपट्टीवासीयांचे डोक्यावरचे छत महापालिकेने हिरावले. गुरुवारी भरदुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील तब्बल १५० झोपड्या तोडल्या. त्यामुळे सर्वांचे संसार उघड्यावर आले. झोपडपट्टीवासीयांना उन्हाचे चटके सहन करीत आपल्या सामानाची आवराआवर करावी लागली. एवढ्या कडक उन्हात डोक्यावरचे छत गेले असताना आता विसावा कुठे घ्यायचा, असा सवाल या झोपडपट्टीवासीयांनी केला आहे.
गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास महापालिकेचे पथक या झोपडपट्टीत पोहोचले व एकाएक बुलडोझरने झोपड्या तोडण्यास सुरुवात झाली. नागरिक झोपड्या सोडण्यास तयार नव्हते. त्यांनी तीव्र विरोध केला. मात्र, पोलीस बळाचा वापर करून झोपडीधारकांना बाहेर काढण्यात आले व झोपड्यांवर बुलडोझर चालविण्यात आला. काही झोपडीधारकांना तर झोपडीतील सामान बाहेर काढण्यासाठीही वेळ मिळाला नाही. संबंधित झोपडपट्टी ५० वर्षांपूर्वीची असल्याचा येथील रहिवाशांचा दावा आहे. अनेकांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आहे. ही सर्व कागदपत्रे दाखवूनही पथकाने कारवाई केली. याचा नागरिकांनी निषेध केला. या वेळी पथकाने झोपडपट्टीला लागून असलेले एक धार्मिक स्थळ तोडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
कारवाईदरम्यान झोपडीधारकांमध्ये एकच धावपळ सुरू होती. लहान मुलांना झाडाखाली बसवून अनेक जण भरउन्हात आपल्या सामानांची जमवाजमव करीत होते. तुटलेल्या झोपडीचे सामान गोळा करीत होते. म्हाताऱ्या नागरिकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला. महिलांची पाण्यासाठी धावाधाव सुरू होती. डोक्यावरील छत गेल्यामुळे महिलांसह पुरुषांच्या डोळ्यातही अश्रू होते. आता एवढ्या उन्हात आम्ही कुठे राहायचे, असा सवाल ते हुंदके देत करीत होते. (प्रतिनिधी)
झोपडपट्टी वसलेली संबंधित जागा महापालिकेची असल्याचा दावा लकडगंज झोनच्या अधिकाऱ्यांनी केला. महापालिकेच्या या मैदानावर झोपडीधारकांना अनधिकृत घरे बांधून नंतर ते स्थायी करून घ्यायचे आहे. दोन वर्षांपूर्वी येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा झोपड्या बांधण्यात आल्या, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Strike the wool and the roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.