लॉकडाऊन आणखी कडक : दुपारी १ नंतर मार्केट `लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 22:13 IST2021-03-16T22:09:43+5:302021-03-16T22:13:49+5:30
Strict lockdown शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार फक्त स्टँड अलोन स्वरूपातील किराणा दुकाने, भाजीपाला, फळे विक्री व चिकन, मटन मांस विक्रीची दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.

लॉकडाऊन आणखी कडक : दुपारी १ नंतर मार्केट `लॉक’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार फक्त स्टँड अलोन स्वरूपातील किराणा दुकाने, भाजीपाला, फळे विक्री व चिकन, मटन मांस विक्रीची दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. मार्केटमध्ये तसेच एकाच ठिकाणी एकाहून अधिक सलग असलेली किराणा दुकाने, भाजीपाला व चिकन, मटन विक्रीची दुकाने बंद राहतील. अशा स्वरूपाचे सुधारित आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी जारी केले.
१५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु बाजारात नागरिकांची किराणा, भाजीपाला, चिकन, मटन व फळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा विचार करता मनपा आयुक्तांनी दुपारी १ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे मार्केट, दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.
फेरीवाल्यांनाही बंदी
हातगाडीवरून भाजीपाला व फळे विकणाऱ्यांनाही दुपारी १ नंतर बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे शहरात दुपारपासून सर्वत्र शुकशुकाट राहणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस व एनडीएस पथकामार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.