अपंग, आजारी रुग्णांना बसणारे स्ट्रेचरचे धक्के होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:40+5:302021-03-13T04:14:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच लिफ्टचीही महत्त्वाची भूमिका असते. मात्र, मेडिकलमध्ये काही वेगळेच चित्र होते. सहा ...

अपंग, आजारी रुग्णांना बसणारे स्ट्रेचरचे धक्के होणार बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच लिफ्टचीही महत्त्वाची भूमिका असते. मात्र, मेडिकलमध्ये काही वेगळेच चित्र होते. सहा लिफ्टमधील चार लिफ्ट २ ते १५ वर्षांपासून बंद होत्या. यामुळे अपंग, आजारी रुग्णांना स्ट्रेचरचे धक्के खावे लागायचे. शस्त्रक्रियागृहापासून ते अतिदक्षता विभागात पोहोचण्यास उशीरही व्हायचा. याची दखल अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी घेत जिल्हा वार्षिक योजनेत लिफ्ट दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी १ कोटी १२ लाख ५६ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे वर्षानुवर्षे बंद असलेली लिफ्ट सुरू होणार आहे.
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेले मेडिकल एकीकडे आधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज होत आहे, तर दुसरीकडे सेवांचा तुटवडा जाणवत आहे. लिफ्टसारख्या उपयोगी सोयीकडे दरम्यानच्या काळात दुर्लक्ष झाले होते. मेडिकल इमारत आणि तेथील उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्षाला कोटी रुपये मिळतात. परंतु, या निधीचा लिफ्टला लाभ मिळत नव्हता. मागील अनेक वर्षांपासून सहापैकी चार लिफ्ट बंद असताना त्याकडे दुर्लक्ष झाले होते. विशेष म्हणजे, मेडिकलच्या तिसऱ्या माळ्यावर रक्तपेढी, दुसऱ्या माळ्यावर गर्भवतींचा वॉर्ड, पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रियागृह तर तळमजल्यावर अतिदक्षता विभाग, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, सोनोग्राफी कक्ष आहेत. लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांना स्ट्रेचरवर ठेवून रॅम्पवरून ओढत न्यावे लागायचे. काही ठिकाणी रॅम्पवर खड्डेही पडले आहेत. यामुळे रुग्णांना अतिदक्षता विभागात किंवा शस्त्रक्रियागृहात तातडीने पोहोचवताना धोका निर्माण व्हायचा. तिसऱ्या मजल्यावरून तळमजला गाठताना नातेवाईकांची दमछाक व्हायची. शस्त्रक्रियागृह ‘जी’, बालरोग विभागाच्या ओपीडीसमोरील, बाह्यरुग्ण विभागातील व अधिष्ठाता कक्षासमोरील लिफ्ट साधारण दीड ते १५ वर्षांपासून बंद आहेत. याचा रुग्णसेवेवर परिणाम होत होता. डॉ. गुप्ता यांनी अधिष्ठाता पदाची सुत्रे हाती घेताच लिफ्ट दुरूस्तीचे कामाला प्राधान्य दिले आहे. जिल्हा वार्षिक नियोजनमधून यासाठी निधी खेचून आणला असून, लवकरच या लिफ्टची दुरुस्ती होऊन ती रुग्णसेवेत रुजू होणार आहे.
-फिजिओथेरपीच्या रुग्णांना चढाव्या लागतात पायऱ्या
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील लिफ्ट मागील दीड वर्षांपासून बंद आहे. पहिल्या मजल्यावर फिजिओथेरपी विभाग, एआरटी सेंटर, ईएनटी विभाग व लसीकरण केंद्र आहे. येथे रॅम्पही नाही. लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना नातेवाईकांची मदत घेत पायऱ्या चढव्या लागतात. काही रुग्णांना तर उचलून नेण्याची वेळ नातेवाईकांवर येते. मात्र, आता निधी मिळाल्याने लवकरच लिफ्ट सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
- बांधकाम होऊन महिनाभरही चालली नाही लिफ्ट
बालरोग विभागाच्या ओपीडीसमोर लिफ्टचे बांधकाम झाले. परंतु, महिन्याभरातच लिफ्टमध्ये पावसाचे पाणी गळायला लागले. पुढील धोका लक्षात घेऊन लिफ्ट बंद करण्यात आली. मागील पाच वर्षांपासून ही लिफ्ट बंद आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या लिफ्टचीही दुरूस्ती होणार आहे.
- जिल्हा वार्षिक योजनेतून लिफ्ट दुरुस्ती ()
मागील काही वर्षांपासून मेडिकल रुग्णालयातील व अधिष्ठाता कार्यालयासमोरील अशा चार लिफ्ट बंद आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनकडे प्रस्ताव सादर केला होता. नुकतीच त्याला १ कोटी १२ लाख रुपयांची मंज़ुरी मिळाली आहे. यामुळे लवकरच या लिफ्ट रुग्णसेवेत रुजू होतील.
- डॉ. सुधीर गुप्ता
अधिष्ठाता, मेडिकल