तणाव-मानसिक खच्चीकरणाने युवावर्गाला ग्रासले; मोबईल गेम, साेशल मीडिया ठरतोय किलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 07:00 AM2021-05-06T07:00:00+5:302021-05-06T07:00:06+5:30

Nagpur News Mobile कोरोना संक्रमणामुळे घरात बंदिस्त असलेली मुले तणाव आणि मानसिक खच्चीकरणामुळे मृत्यूला आलिंगन देत आहेत. स्वत:च अनेक समस्यांनी ग्रासलेले पालक मुलांच्या मानसिक अवस्थांबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे घटनेनंतर आयुष्यभर दु:ख सहन करणे हीच त्यांची नियती ठरत आहे.

Stress-induced mental retardation engulfed the youth; Mobile games, social media is becoming a killer | तणाव-मानसिक खच्चीकरणाने युवावर्गाला ग्रासले; मोबईल गेम, साेशल मीडिया ठरतोय किलर

तणाव-मानसिक खच्चीकरणाने युवावर्गाला ग्रासले; मोबईल गेम, साेशल मीडिया ठरतोय किलर

Next
ठळक मुद्दे कोरोना संक्रमणाची दुसरी लाट अधिक घातक

जगदीश जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे घरात बंदिस्त असलेली मुले तणाव आणि मानसिक खच्चीकरणामुळे मृत्यूला आलिंगन देत आहेत. स्वत:च अनेक समस्यांनी ग्रासलेले पालक मुलांच्या मानसिक अवस्थांबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे घटनेनंतर आयुष्यभर दु:ख सहन करणे हीच त्यांची नियती ठरत आहे. गेल्या आठवडाभरात अल्पवयीन मुलांनी केलेल्या आत्महत्या या समस्यांचे संकेत देत आहेत.

गेल्या एक वर्षापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, ऑनलाईन क्लास हेच त्यांचे शैक्षणिक आयुष्य ठरत आहे. याचा परिणाम अभ्यासासह बाहेरील क्रीडा उपक्रम व अन्य सामाजिक उपक्रमापासून ते दूर झालेले आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू होती, तेव्हा ही मुले अभ्यासासह इतर उपक्रमात सहभागी तर होतच होते, शिवाय मित्रांसोबत वेळ घालवून आपल्या मनातील घालमेल व्यक्त करीत होते आणि स्वत:च त्यातून मार्ग काढत होते. परंतु, कोरोना संक्रमणाने मुलांचे हे मानसिक स्वातंत्र्य हिरावले आहे. पालक आणि मुले दोघेही घरात बसले आहेत. पालकांवर नोकरी-व्यवसाय आणि आर्थिक संकटाचा डोंगर उभा झाला आहे तर, मुले चार भिंतीत कोंडल्यामुळे अवसादाने ग्रासले आहेत. ऑनलाईन क्लासमुळे प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आला आहे. अभ्यासानंतर मुले गेम्स किंवा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होतात. अशा तऱ्हेने मोबाईलची सवय केव्हा व्यसनात बदलते, हे मुलांनाही कळत नाही. ते तास न्‌ तास मोबाईल हाताळत आहेत, त्यामुळे पालकही क्रोधीत होत आहेत. ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या कुटुंबातील मुले तर आणखीनच कठीण स्थितीत आहेत. हेच नकारात्मक विचार त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत आहेत.

याबाबतीत ‘लोकमत’ने मनोचिकित्सक डॉ. पवन आडतिया यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी कोरोना संक्रमणाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह असल्याचे सांगितले. मृत्यूचा आकडाही मोठा असल्याने प्रत्येक जण तणावात आहे. वयस्कांप्रमाणेच मुलेही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. मुलांचा बहुमुखी विकास ठप्प पडला आहे. मोबाईल गेम्स व सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत आहेत. याचा परिणाम अभ्यास आणि मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे दबाव सहन करण्याची शक्ती व संयम ढासळला आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तात्काळ परिणाम हवा आहे. मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींमुळे ते लगेच उग्र होत आहेत. नकारात्मकता निर्माण झाल्याने ते आत्मघाताचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणे गरजेचे असल्याचे डॉ. आडतिया म्हणाले. मोबाईल फोज्या यापासून दूर करण्यासाठी इनहाऊस किंवा आऊटडोअर गेम्स खेळणे, ज्या गोष्टींचे आकर्षण आहे, त्या गोष्टी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.

केस १

१५ वर्षीय संस्कृता नवव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. वडील केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. कुटुंबात आई-वडील आणि भाऊ आहे. संस्कृताला मोबाईल गेम्सचे व्यसन जडले होते. २४ एप्रिलला संस्कृताने आईकडे मोबाईल मागितला. आईने आधी जेवण करण्यास सांगितले. मात्र, संस्कृता मोबाईलसाठी अडून बसली. या अगदी सामान्य बाबीवर नाराज होऊन संस्कृताने गळफास घेतला. घटनेची माहिती होताच भावाने तिला खाली उतरवून तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, २९ एप्रिलला तिची प्राणज्योत मालवली.

केस २

१६ वर्षीय कैवल्य गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. त्याचे वडील शिक्षक आहेत. कुटुंबात आई-वडील व लहान बहीण आहे. कैवल्य निरागस आणि आनंदी स्वभावाचा विद्यार्थी होता. दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेण्याकरिता तो ऑनलाईन आवेदन करणार होता. २९ एप्रिल रोजी दुपारी त्याने वडिलांना मोबाईलवर ऑनलाईन आवेदन करण्याबाबत चर्चाही केली. त्यानंतर तो आपल्या बेडरूममध्ये गेला. मात्र, बेडरूममध्ये त्याने गळफास घेतला. काही वेळानंतर बेडरूममधून कुठलीच हालचाल होत नसल्याचे बघून वडील तेथे गेले असता स्थिती बघून ते सुन्न झाले. कैवल्यच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याला गेम्स किंवा अन्य कुठलीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

केस ३

१७ वर्षीय भावेश बाराव्या वर्गाचा विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील शिक्षक आहेत आणि बहीण चिकित्सक असल्याचे सांगितले जाते. उच्चशिक्षित कुटुंबातील भावेश हा महत्त्वाकांक्षी विद्यार्थी होता. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याचे राहणीमान होते. २९ एप्रिलच्या संध्याकाळी त्याचे आई-वडील आजारी नातेवाईकाचा हालहवाल विचारण्यासाठी गेले होते आणि बहीण बाहेर होती. घरात एकटा असलेल्या भावेशने गळफास घेतला. भावेशने घेतलेल्या या निर्णयाचे उत्तर अजूनही कुणाकडे नाही.

केस ४

१७ वर्षीय मेरिट विद्यार्थिनी निधी डॉक्टर बनण्याची तयारी करीत होती. त्यासाठी ती परिश्रमही घेत होती. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून ती ऑनलाईन क्लासवरच निर्भर होती. रात्री उशिरापर्यंत जागून ती अभ्यास करायची. मात्र, कोरोना प्रकोपामुळे अभ्यासात अडचण निर्माण झाली होती. १ मे रोजी निधीने रात्री गळफास घेतला. तिने आपल्या खोलीमध्ये लागलेल्या व्हाईट बोर्डवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. अभ्यासाचा दबाव सहन होत नसल्याने तिने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे लिहिले होते. निधीला दहावीत ९७ टक्के गुण मिळाले होते. अभ्यासातही ती उत्तम होती. मात्र, तणाव अत्याधिक वाढल्याने तिने जीव दिला.

...............

Web Title: Stress-induced mental retardation engulfed the youth; Mobile games, social media is becoming a killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल