हंसापुरीत घरे पाडल्याने तणाव
By Admin | Updated: June 28, 2014 02:42 IST2014-06-28T02:42:39+5:302014-06-28T02:42:39+5:30
मध्य नागपुरातील हंसापुरी परिसरात नाल्याच्या शेजारी उभारण्यात आलेली १६ पक्की घरे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमिनदोस्त केली.

हंसापुरीत घरे पाडल्याने तणाव
नागपूर : मध्य नागपुरातील हंसापुरी परिसरात नाल्याच्या शेजारी उभारण्यात आलेली १६ पक्की घरे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमिनदोस्त केली. विरोधानंतरही कारवाई केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पथकावर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी नागरिकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला. यात १५ वर्षीय युवक कमल उईके याचे डोके फुटले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी घटनास्थळी दाखल होत कारवाईला विरोध दर्शविला.
खदान भागातील नाल्याच्या शेजारी काही नागरिकांनी पक्की घरे बांधली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते तेथे वास्तव्यास आहेत. महाल- गांधीबाग झोनच्या पथकाने नाल्याच्या शेजारी अतिक्रमण केल्याचे कारण देत शुक्रवारी ही घरे तोडण्यास सुरुवात केली. मदन गौर, शिवचरण नायक, दिवाकर तिवारी, छाया गौर, श्यामू गौर, जगतराम यादव, महेश बरमईया, रामकली गुडी आदींचे घर तोडण्यात आले. नागरिकांनी कारवाईला विरोध केला. पण पोलीस बळाचा वापर करीत कारवाई करण्यात आली. आपद्ग्रस्त नागरिकांनी या कारवाईची माहिती माजी मंत्री अनिस अहमद यांना मोबाईलवर दिली. सायंकाळी ५ च्या सुमारास अहमद घटनास्थळी पोहचले. त्यांनी कारवाई अन्यायकारक असून बांधकाम पाडणे थांबविण्याची मागणी केली. अहमद यांच्या पाठबळामुळे नागरिक अतिक्रमण विरोधी पथकावर संतापले. महापालिकेच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. या वेळी संतप्त नागरिकांनी पथकावर व जेसीबीवर दगडफेक केली. जेसीबी चालकाने पळ काढला. नागरिकांनी जेसीबीच्या काचा फोडल्या. या वेळी पोलिसांनी नागरिकांवर लाठीमार केला. यात बऱ्याच जणांना गंभीर जखमा झाल्या. महापालिकेच्या तक्रारीनंतर नागरिकांवर तहसील पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.
अतिक्रमण पथकाने कारवाई दरम्यान येथे असलेले जुने मसोबा मंदिर पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकरणी अनिस अहमद म्हणाले, येथे राहणाऱ्या नागरिकांजवळ १९९५ चे फोटोपास आहे. आयुक्तांनी नाल्याच्या शेजारचे चार फूटापर्यंतचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. पण पथकाने पक्की घरे पाडली. पावसाळ्यात नागरिकांची घरे पाडताच येत नाही. १६ कुटुंबे पावसाळ्यात रस्त्यावर आली आहेत. ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे. या कारवाईच्या विरोधात उद्या, आपण आयुक्तांची भेट घेऊ. घर तोडण्यात आलेल्या नागरिकांना पर्यायी जागा द्यावी व पक्के घर बांधून द्यावे, अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)