न्यायसंस्था टिकण्यासाठी पाया बळकट हवा
By Admin | Updated: May 2, 2015 02:12 IST2015-05-02T02:12:22+5:302015-05-02T02:12:22+5:30
कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश न्यायसंस्थेचा पाया आहेत. हा पाया बळकट असला तरच न्यायसंस्थेची इमारत टिकेल,

न्यायसंस्था टिकण्यासाठी पाया बळकट हवा
नागपूर : कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश न्यायसंस्थेचा पाया आहेत. हा पाया बळकट असला तरच न्यायसंस्थेची इमारत टिकेल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवातर्फे आयोजित ‘ज्युडिशियल सर्व्हिस अॅज अ करिअर’ या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे शुक्रवारी न्या. गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी व सेंट्रल कॉलेज आॅफ लॉचे प्राचार्य डॉ. एस. एम. राजन प्रमुख अतिथी होते. कार्यक्रम नागपूर खंडपीठाच्या सभागृहात झाला.
न्या. गवई म्हणाले, नवीन वकिलांच्या इंग्रजीची फार वाईट अवस्था आहे. चांगले न्यायाधीश होण्यासाठी स्वत:ला परिपूर्ण करणे आवश्यक आहे. परिश्रमाशिवाय कुणालाही फळ मिळत नाही. भारतीय न्यायसंस्थेला सक्षम न्यायाधीशांची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक व आर्थिक समानता हवी होती. यामुळे राज्यघटनेत ‘शेड्युल-९’चा समावेश करण्यात आला. ‘शेड्युल-९’मधील कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. परंतु, संबंधित कायदे राज्यघटनेशी सुसंगत आहेत किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार न्यायालयांना आहे, असे सांगून त्यांनी बार कौन्सिलच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
न्या. चौधरी यांनी बार कौन्सिलतर्फे दर्जेदार न्यायाधीश व वकील घडविण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगून याबाबत आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांनी वकिलांच्या इंग्रजीवर चिंता व्यक्त केली. वकिलांना पायाभूत इंग्रजी आलीच पाहिजे असे मत नोंदवून त्यांनी यासंदर्भात बार कौन्सिलने मार्गदर्शन करण्याची सूचना केली.
डॉ. राजन यांनी राज्यघटनेतील ‘शेड्युल-९’चा उद्देश पूर्ण झाल्यामुळे ते रद्द करणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायाधीश न्यायदानाचे महान कार्य करीत असतात. समाजात शांतता नांदण्यासाठी सर्वांना न्याय मिळणे आवश्यक आहे. न्यायाधीश होणाऱ्या सर्व वकिलांनी ही बाब लक्षात ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
व्यासपीठावर कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्ष अॅड. अशोक पाटील, माजी अध्यक्ष अॅड. ए. यू. पठाण, माजी अध्यक्ष अॅड. जयंत जाईभावे, माजी अध्यक्ष अॅड. अनिरुद्ध चौबे उपस्थित होते. याप्रसंगी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करणाऱ्या वकिलांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)