नागपूर : सडक्या सुपारीच्या तस्करीचे मोठे केंद्र असलेल्या नागपुरात परत दलाल व व्यापारी सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून तब्बल सव्वा सहा हजार किलोंहून अधिक सडक्या सुपारीचा माल जप्त केला आहे. ही सडकी सुपारी विविध पानठेल्यांसह विदर्भ व मध्य भारतात पाठविल्या जाणार होती.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली. कळमना मार्केटमधील प्रिती इंडस्ट्रीज व धारगाव येथील लक्ष्मी कोल्ड स्टोरेज येथे सडक्या सुपारीचा मोठा साठा असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिसांनी गुरुवारी तेथे धाड टाकली असता मोठा साठा आढळला. प्रिती इंडस्ट्रीजमध्ये ४८ पोत्यांमध्ये एकूण २ हजार ४९८ किलो सुपारी आढळली. तिची किंमत ७.६८ लाख इतकी होती. तर लक्ष्मी कोल्ड स्टोरेजमध्ये ५७ पोत्यांमध्ये ३ हजार ९९० किलो सुपारी आढळली. या मालाची किंमत ९.९७ हजार इतकी होती. पोलिसांनी एकूण १७.६५ लाखांचा मुद्देमाल दोन्ही ठिकाणांहून जप्त केला.
सडक्या सुपारीसंदर्भात सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांनी दोन वर्षांअगोदर मोठी कारवाई केली होती. त्यानंतर नागपुरात काही काळ ही तस्करी थंडावली होती. मात्र काही काळापासून परत तस्कर व व्यापारी सक्रिय झाले होते. ही सुपारी शरीरासाठी घातक आहे.
शहरातील अनेक पानठेले तसेच विदर्भ-मध्य भारतात याचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात येतो. अनेक पोलीस ठाण्यातील पथकांकडूनदेखील याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करण्यात येते. पोलीस निरीक्षक अनिल ताकसाडे, अमित देशमुख, विनोद गायकवाड, विजय श्रीवास, दिनेश डवरे, जितेश रेड्डी, दिपक दासरवार, दिपक लाखडे, विशाल रोकडे, मंगेश मेश्राम यांच्या पथकाने ही कारवाई केली.