‘एका उत्तराची कहाणी’ भावनिक संघर्ष मांडणारे नाट्य
By Admin | Updated: November 18, 2015 03:08 IST2015-11-18T03:08:55+5:302015-11-18T03:08:55+5:30
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमाला प्रोत्साहित करणाऱ्या व संपूर्ण देशात केवळ राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात ...

‘एका उत्तराची कहाणी’ भावनिक संघर्ष मांडणारे नाट्य
राज्य नाट्य स्पर्धा : मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
नागपूर : मराठी माणसाच्या नाट्यप्रेमाला प्रोत्साहित करणाऱ्या व संपूर्ण देशात केवळ राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. ही स्पर्धा सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी पहिलेच नाटक ‘एका उत्तराची कहाणी’ इंदोरच्या कलावंतांनी सादर करून रसिकांची दाद घेतली.
या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक किशोर कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, माजी अध्यक्ष प्रमोद भुसारी, पराग लुले, किशोर आयलवार, नलिनी बन्सोड यांच्यासह परीक्षक पाटणकर, दणगे, मानसी राणे प्रामुख्याने उपस्थित होते. नटराज पूजनाने स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे यश -अपयश आपल्या हातात नसते. पण यशासाठी प्रयत्न करणे आपल्याच हाती असते, असे किशोर कुळकर्णी यांनी प्रतिपादन केले. उपस्थितांचे स्वागत नाट्य परिषदेतर्फे करण्यात आले. प्रास्ताविक आणि आभार वैदेही चवरे हिने मानले.
यानंतर वेल अॅन वेल पब्लिक एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी, इंदोरच्यावतीने ‘एका उत्तराची कहाणी’ या मनोरुग्ण किशोर वयाच्या मुलीच्या मध्यवर्ती भूमिकेभोवताल गुंफलेले नाट्य सादर करण्यात आले. समाजातील मतिमंद तरुणांच्या भावनिक गरजांचा वेध घेणारे आणि वाढत्या वयातील अशा मुलांच्या शारीरिक व मानसिक गरजांकडे लक्ष वेधणारे हे नाटक होते. सामाजिक विषय आणि भावनिक आशयाच्या या सादरीकरणाला रसिकांनीही दाद दिली. योगेश न नीता यांची मोठी मुलगी तेजू ही बुद्धिवान, उच्चशिक्षित आणि नोकरी करणारी. धाकटी विशाखा वयाच्या तिसऱ्याच वर्षी मतिमंद होते. मेंदूत ताप गेल्याने एका दुर्दैवी क्षणी मतिमंद झालेली ही मुलगी. वाढत्या वयाबरोबर तिच्या भावनिक आणि शारीरिक गरजा, तिची आक्रमकता आणि बेभान वागणूक यामुळे सतत तणावाखाली असलेले हे कुटुंब. मतिमंदांच्या संस्थेत तिला ठेवण्यासाठीचा विचार समोर येतो, पण तिची आईच विरोध करते. पण तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सहवाससुखासाठी एका मतिमंद तरुणाच्या संपर्कात आणण्याच्या विचित्र निर्णयाजवळ हे दमदार सादरीकरण थांबते. नाटकाचे लेखन अरविंद लिमये तर दिग्दर्शन श्रीकांत भोगले यांचे होते.
विशाखा या मनोरुग्ण मुलीची भूमिका समर्थपणे साकार करणारी फाल्गुनी सुपेकर, रेखा देशपांडे, श्रीकांत भोगले, भक्ती औरादकर, हिमांशु पंडित, मंजुश्री भोगले, सीमा महाजन यांच्या सकस अभिनयाचे हे सादरीकरण होते. संगीत आकाश कस्तुरे, नेपथ्य करण भोगले, प्रकाशयोजना तुषार धर्माधिकारी, अनिल बुद्धिवंत, विनय महाजन, सोनल पटवर्धन, दीपाली कोरान्ने, प्रिया धर्माधिकारी यांनी तांत्रिक बाजू पाहिल्या. (प्रतिनिधी)