मानवी जगण्याचा शोध घेणाऱ्या ‘मृत्यू’ वरील कथावाचन
By Admin | Updated: July 18, 2014 01:02 IST2014-07-18T01:02:12+5:302014-07-18T01:02:12+5:30
कथा हा लेखनप्रकार विलक्षण आहे. कमी शब्दात आयुष्याचा मोठा अर्थ आणि मोठा पट मांडतानाही केलेले संक्षिप्त पण अपूर्ण न वाटणारे वर्णन हा कथेचा आवाका आहे. कथा लांबीने लहान असली तरी फार

मानवी जगण्याचा शोध घेणाऱ्या ‘मृत्यू’ वरील कथावाचन
विदर्भ साहित्य संघ : कथाकार भारत सासणे आणि डॉ. शोभणे यांचे कथावाचन
नागपूर : कथा हा लेखनप्रकार विलक्षण आहे. कमी शब्दात आयुष्याचा मोठा अर्थ आणि मोठा पट मांडतानाही केलेले संक्षिप्त पण अपूर्ण न वाटणारे वर्णन हा कथेचा आवाका आहे. कथा लांबीने लहान असली तरी फार मोठा आशय मांडण्याची ताकद कथा या प्रकारात आहे. हल्ली तर वाचकांचे जगणे बदलले, धावपळ वाढली आणि वेळेचा अभाव निर्माण झाला. जड कादंबऱ्या घेऊन वाचत राहण्याइतपत वेळ मिळत नसल्याने लोक बऱ्यापैकी कथावाचनाकडे वळले आहे. स्वत:च्या निवेदनात्मक शैलीमुळे अद्भुताची ओढ असणाऱ्या भारत सासणे यांचे नाव कथा या प्रकारात आदराने घेतले जाते. त्यांची कथा थेट त्यांच्याकडूनच ऐकण्याचा योग तसा दुर्मिळ असला तरी हा योग आज नागपूरकरांना लाभला. मानवी जगण्याचा शोध घेणाऱ्या पण मृत्यूचे चिंतन करणाऱ्या त्यांच्या कथेमुळे उपस्थितांना आज अंतर्मुख केले.
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने ग्रंथसहवास उपक्रमांतर्गत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे आणि कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांच्या कथावाचनाचा कार्यक्रम संघाच्या सांस्कृतिक संकुलातील ग्रंथालयात आयोजित करण्यात आला. भारत सासणे स्वत: त्यांचीच कथा सादर करणार असल्याने उपस्थितांमध्ये कुतुहल होते. त्यांनी ‘मांजर’ या कथेचे वाचन केले. त्यांना अभिप्रेत असलेले अर्थ यानिमित्ताने त्यांच्या वाचनातून उलगडत गेले. ही दोन वृद्धांची कथा आहे. वृद्धावस्थेच्या टोकाला असलेल्या दोन वृद्धांची ही कथा. यापैकी एकाला सतत एक काळी मांजर दिसते. ही मांजर म्हणजे यमदूतच असल्याचा भास एका वृद्धाला होतो आणि आता मृत्यू जवळ आलाय, याची जाणीव त्याला होते. ही मांजर इतर कुणालाच दिसत नाही. मृत्यूचे चिंतन करताना जगण्याचे अनेक पदर उलगडत जाणारी ही कथा उपस्थितांना विचार करायला लावणारी होती. तरल काव्यात्मकता आणि नाट्यमयता ही त्यांच्या कथा सादरीकरणाची वैशिष्ट्ये होती.
यानंतर डॉ. शोभणे यांनी ‘दिगंबर गोसावी’ ही कथा सादर केली. मानवी आयुष्य, स्त्री-पुरुष सहसंबंध यावर मार्मिक आणि खोल भाष्य करणारी ही कथा त्यांनी ताकदीने सादर केली. त्यांचे सादरीकरण प्रवाही आणि प्रभावी होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. इंद्रजीत ओरके यांनी केले. याप्रसंगी ग्रंथालयाचे दिलीप म्हैसाळकर, पराग घोंगे, डॉ. पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)