जिल्ह्याला पुन्हा वादळाचा फटका
By Admin | Updated: June 3, 2015 02:43 IST2015-06-03T02:43:40+5:302015-06-03T02:43:40+5:30
जिल्ह्यातील मौदा व भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये रविवारी रात्री वादळामुळे काही घरांचे नुकसान झाले होते.

जिल्ह्याला पुन्हा वादळाचा फटका
नागपूर : जिल्ह्यातील मौदा व भिवापूर तालुक्यातील काही गावांमध्ये रविवारी रात्री वादळामुळे काही घरांचे नुकसान झाले होते. त्यातच मंगळवारी दुपारी व सायंकाळी सावनेर, नरखेड, नागपूर (ग्रामीण), उमरेड, मौदा, रामटेक, कळमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये वादळामुळे घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. रामटेक व कळमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये तुरळक गारपीटही झाली. वादळामुळे प्राणहानी झाली नसली तरी, काही घरांवरील छप्पर उडाल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.
सावनेर शहरासह परिसरातील काही गावांमध्ये मंगळवारी दुपारी वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम), मोहगाव (भदाडे) परिसरात वादळासह पावसाने हजेरी लावली. कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी (खु), तिष्टी (बु), तेलगाव, बादेरा, तिडंगी, कोहळी परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे तिष्टी (खु) व तिष्टी (बु) येथील काही घरांवरील छप्पर उडाले. या शिवारातील झाडे उन्मळून पडली होती. विजेचे खांब वाकल्याने या गावांमधील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता.
रामटेक तालुक्यातील नगरधन व काचूरवाही तसेच मौदा तालुक्यातील चाचेर परिसरात सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी बोराच्या आकाराची गारपीटही झाली.
कुही तालुक्यातील कुही मांढळ, वेनतूर, आंभोरा, साळवा, राजोला, तारणा, गोठणगाव जीवनापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या.
धामणा परिसरात वादळी पावसामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली होती. रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात दुपारपासूून जोरात हवा वाहायला सुरुवात झाली होती. त्यामुळे देवलापार व परिसरातील काही गावांमधील वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता.
मौदा शहरासह तालुक्यातील गांगनेर, मांगली, नरसाळा परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळासह पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे काहींच्या घरांवरील टिनपत्र्यांचे व गवताचे छप्पर उडाले. काहींच्या घरांवरील कवेलू उडाल्याने त्यांचे नुकसान झाले. मौदा परिसरात अंदाजे एक तास मुसळधार पाऊस बरसला. या पावसाचा मौदा शहरातील नाथनगर, चक्रधरनगर, गरदेव मोहल्ल्यातील कच्च्या घरांचे नुकसान झाले.
वादळामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे पारा अचानक खाली उतरला. तापमानातील या चढ-उतारामुळे मुले व वयोवृद्ध मंडळी आजारी होण्याची शक्यता बळावली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधींकडून)