कोरोनावरील काढा घेण्यासाठी ड्रॅगन पॅलेस येथे तुफान गर्दी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:36+5:302021-04-20T04:08:36+5:30
कामठी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढतो आहे. उपचाराअभावी रुग्णांचा जीव जात आहे. अशातच नागपुरातील इंदोरा परिसरातील डॉ. प्रज्ञा ...

कोरोनावरील काढा घेण्यासाठी ड्रॅगन पॅलेस येथे तुफान गर्दी!
कामठी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढतो आहे. उपचाराअभावी रुग्णांचा जीव जात आहे. अशातच नागपुरातील इंदोरा परिसरातील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांनी तयार केलेला काढा घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. सोमवारी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरात हा काढा घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र येथे संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हे वितरण बंद पाडले.
मेश्राम यांच्या वतीने ड्रॅगन पॅलेस टेंपलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे रविवारी सांयकाळी ५ वाजतापासून काढा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच लोकांनी शनिवारच्या मध्यरात्रीपासूनच सभागृहाबाहेर रस्त्यावरील डिव्हायडरवर बसून रांगा लावायला सुरुवात केली. पाहता पाहता या परिसरात जवळपास ६ हजाराहून अधिक नागरिकांची गर्दी झाली. राज्यात संचारबंदी असताना या परिसरात झालेली गर्दी कोरोनाच्या संक्रमणास कारणीभूत ठरेल, अशी भूमिका घेत स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या वतीने काढा वाटपाच्या आयोजक माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांना या करिता नियोजन करण्यास सांगण्यात आले. तसेच वितरणाकरिता वेगवेगळे स्टॉल तयार करण्याचे सांगितल्या गेले. पण आयोजकांनी याची दखल न घेता काढा वाटपाचा कार्यक्रम सुरूच ठेवला. सोमवारी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी त्यांना परतवून लावले. काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
तहसीलदारांची नोटीस
ड्रॅगन पॅलेस परिसरात काढा घेण्यासाठी झालेली गर्दी आणि कोरोनाचा संक्रमणाचा धोका लक्षात घेत सोमवारी कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी डॉ. प्रज्ञा मेश्राम व ओगावा सोसायटीच्या संचालकांना नोटीस देत काढा वितरण बंद करण्याच्या सूचना केल्या. यासोबतच काढा वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडून रीतसर परवानगी घेण्यास सांगितले.
--
डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा आयुर्वेदिक काढा कोरोनावर मात करण्यात उपयुक्त ठरत आहे. अशात पोलिसांनी बळजबरीने ड्रॅगन पॅलेस येथील काढ्याचे वितरण बंद पाडले. प्रशासनाने २४ तासात ड्रॅगन पॅलेस टेंपल येथील काढा वितरण केंद्र सुरू करण्याची पुन्हा परवानगी द्यावी. तसे न झाल्यास बुधवारपासून उपोषणावर बसू.
अॅड. सुलेखा कुंभारे, अध्यक्ष ओगावा सोसायटी
----
कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरातील कोरोनावरील काढा घेण्यासाठी नागरिकांची अशी गर्दी उसळली होती.