नागपूर-जबलपूर महामार्गावर रास्ता रोको

By Admin | Updated: May 20, 2014 01:11 IST2014-05-20T01:11:29+5:302014-05-20T01:11:29+5:30

देवलापार पोलिसांच्या जाचाला कंटाळून वृद्धाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वरघाट येथे रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे वरघाट येथे

Stop the route on the Nagpur-Jabalpur highway | नागपूर-जबलपूर महामार्गावर रास्ता रोको

नागपूर-जबलपूर महामार्गावर रास्ता रोको

रामलाल आत्राम आत्महत्याप्रकरण : देवलापार पोलीस ठाण्याला घेराव

 करवाही/हिवराबाजार : देवलापार पोलिसांच्या जाचाला कंटाळून वृद्धाने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वरघाट येथे रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे वरघाट येथे तणाव निर्माण झाला. यात दोषी असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी ग्रामस्थांनी मृतदेह देवलापार पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठाण्याला घेराव व नागपूर-जबलपूर माहामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. रामलाल आत्राम (६३, रा. वरघाट, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण देवगडे, शिपाई राजेश पाली यांच्यासह सहा पोलीस तीन मोटरसायकलींवर वरघाट येथे आले होते. यातील एकाने रामलालला कट मारला. त्यामुळे रामलालने पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिसांनी रामलालला मारहाण करीत देवलापार पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करून आरोपी फरार असल्याची नोंद केली व सोडून दिले. रविवारी सायंकाळी नारायण देवगडे व त्याच्या सहकार्‍यांनी रामलाल व लक्ष्मण कोडवते यांच्या घराची दीड तास झडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. पोलिसांनी रामलालला शिवीगाळ केली व अटक न करताच निघून गेले. सायंकाळी रामलालने आत्महत्या केली. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना माहिती दिल्यानंतर देवलापार पोलीस रात्री ८ वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. देवगडे याला घटनास्थळी बोलावण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी मृतदेहाला हात लावू देण्यास पोलिसांना नकार दिल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे अतिरिक्त पोलीस कुमक बोलावण्यात आली होती. मृत रामलालच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, पोलिसांनी रामलालला पाच हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास अटक करण्याची धमकी दिली. रामलाल हा दारू पीत अथवा विकत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांचे बयाण नोंदवून मृतदेहाची उत्तरीय तपासणी रामटेक येथे करण्याचे आश्वासन साळुंके यांनी दिल्याने ग्रामस्थ शांत झाले. रात्री ११.३० वाजतापासून उशिरापर्यंत बयाण नोंदविण्यात आले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास रामटेक येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे व महेश ब्रम्हनोटे यांनी रात्री घटनास्थळाला भेट दिली. सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी रामलालचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला व रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. रोडवर टायर जाळण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली होती. देवगडे, राजेश पाली, राजू राठोड, शैलेश बिंझाडे यांंना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी रेटून धरली होती. (वार्ताहर)

Web Title: Stop the route on the Nagpur-Jabalpur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.