आदिवासी विद्यार्थिनींचा रास्ता रोको

By Admin | Updated: January 11, 2017 02:54 IST2017-01-11T02:54:32+5:302017-01-11T02:54:32+5:30

तुली पब्लिक स्कूल, होलिक्रॉस पब्लिक स्कूल बुटीबोरी, नानाभाऊ कोकरे आदिवासी आश्रम शाळा,

Stop the path of tribal students | आदिवासी विद्यार्थिनींचा रास्ता रोको

आदिवासी विद्यार्थिनींचा रास्ता रोको

तुली पब्लिक स्कूल, होलिक्रॉस पब्लिक स्कूलचा निषेध : कारवाईची मागणी
नागपूर : तुली पब्लिक स्कूल, होलिक्रॉस पब्लिक स्कूल बुटीबोरी, नानाभाऊ कोकरे आदिवासी आश्रम शाळा, खामगाव येथील विद्यार्थिनींवर झालेला अत्याचार, आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या वाढलेल्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थिनी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान संविधान चौकात विद्यार्थिनींनी रस्त्यावरच ठिय्या देऊन रास्ता रोको केला.
शासनाने तिन्ही घटनांमध्ये लक्ष घालून, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये घटनेची तपासणी करून, गुन्हेगारांवर खटले चालवावे, अशी मागणी केली. समितीच्या अध्यक्ष नीलिमा मडावी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात नागपूरसह विदर्भ व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक सहभागी झाले होते. अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय पथकाची नेमणूक करून, प्रत्येक आश्रमशाळेची चौकशी करावी, तिन्ही घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करावी, पीडित आदिवासी विद्यार्थिनींना आजीवन राज्यपालाच्या देखरेखीत दत्तक घेण्यात यावे, तिन्ही घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्चात सारिका वट्टी, माधुरी कुडमेथी, स्नेहा मेश्राम, निशा अडमाची आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Stop the path of tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.