पंप चालकांचे खरेदी बंद आंदोलन
By Admin | Updated: April 10, 2015 02:17 IST2015-04-10T02:17:48+5:302015-04-10T02:17:48+5:30
सीआयपीडी या राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील फामपेडशी संलग्न विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनतर्फे...

पंप चालकांचे खरेदी बंद आंदोलन
नागपूर : सीआयपीडी या राष्ट्रीय पातळीवरील पेट्रोलियम डीलर्स संघटनेच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील फामपेडशी संलग्न विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी ११ एप्रिलला पेट्रोल खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. यादिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळात एका शिफ्टमध्ये पंप सुरू राहणार असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
एलबीटी, व्हॅट, एसएससी या विषयावर राज्य सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावेत. मागण्या न सुटल्यास बेमुदत खरेदी बंद आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनने यावेळी दिला.
डीलर्स मार्जिन वाढवावी, अपूर्वचंद्र समितीच्या शिफारशीनुसार वर्षातून दोनदा खर्चावर आधारित सुधारणा व्हावी, पंपावरील सेवा सुविधा सशुल्क असावी, मार्जिन ठरविताना १९९७ चा (नेट फिक्स अॅसेट) आधार घ्यावा, नवीन ३३,००० डीलर्सच्या नेमणुका त्वरित थांबवाव्यात, याशिवाय जे डीलर्स व्यवसायात राहू इच्छित नाहीत, त्यांना डीलरशिपमधून बाहेर पडण्याचा व त्यांना त्यांच्या जमिनी परत ताब्यात देण्यात याव्यात, अशी मागणी असोसिएशनने केली.
स्पर्धात्मक युगामध्ये खासगी स्पर्धकांना कोणतीही एमडीजी लागू नाही. निकोप स्पर्धेसाठी व गैरवापर टाळण्यासाठी एमडीजी रद्द करण्यात यावा आणि एमडीजीखाली असलेल्या दंडात्मक कारवाईची तरतूद रद्द करावी, छोट्या टँकरमधून डिझेल विक्री बंद व्हावी, जुन्या डीपची कालबाह्य पद्धत बंद रद्द करून पंपावर येणारा स्टॉक फ्लो मीटरने ताब्यात मिळावा, डीलर्सचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नमूद केलेल्या तारखांनाच पेट्रोल व डिझेलचे दर कमी-जास्त व्हावेत, कुटुंबातील सदस्यांमध्ये डीलर्सशिपच्या मालकीविषयी बदल करायचा असल्यास ती पद्धत सोपी करून त्यावर फी आकारू नये, रिसाईटेड साईट्सला दुसरे प्रॉडक्ट देऊन कायम डीलर करावे, डायव्हर्शन, नो एन्ट्री, रस्ता रुंदीकरण, पूल या कारणांनी आपद्ग्रस्त झालेल्या डीलर्सचे पुनर्वसन करावे, आदी मागण्यांवर सरकार आणि कंपन्यांनी गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी असोसिएशनने केली. (प्रतिनिधी)