पेटचे निकाल परत घोषित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:22+5:302021-09-23T04:10:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पेटचे निकाल परत जाहीर करण्यात येणार आहेत. आरक्षित प्रवर्गातील ...

पेटचे निकाल परत घोषित होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पेटचे निकाल परत जाहीर करण्यात येणार आहेत. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठीच्या गुणांत सूट देण्यात आली नव्हती. यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डायरेक्शन क ११ ऑफ २०२१ ला परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नवीन नियमावली जारी करण्यात येणार आहे. लोकमतने आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली होती.
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली व परीक्षा-मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांना याबाबत अधिसूचना जारी करण्यास सांगण्यात आले आहे. डॉ. साबळे यांनी याला दुजोरा दिला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत दिनेश शेराम यांनी हा मुद्दा उपस्थित केला व आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली. बैठकीत जुनी नियमावली व इतर विद्यापीठाच्या नियमावलीची तुलना करण्यात आली व त्यानंतर आदेश जारी करण्यात आले. याबाबत कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काय आहे प्रकरण
नागपूर विद्यापीठाच्या पीएच.डी. नोंदणीपूर्व प्रवेश परीक्षा असलेल्या पेटमध्ये आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी गुणांची कुठलीही सूट देण्यात आली नाही. त्यामुळे ‘पेट’मध्ये सहभागी झालेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कायद्यानुसार आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पेटमध्ये यशस्वी होण्यासाठी कमीत कमी ४५ टक्के गुणांची अट ठेवायला हवी होती.