शेतातील संत्रा झाडे चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:20+5:302021-09-23T04:10:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड: शेतातील पीक,अवजारे , विहिरीतील मोटर चोरीला जाण्याच्या घटना नेहमी घडतात परंतु जमिनीत रुजलेली संत्रा झाडे ...

शेतातील संत्रा झाडे चोरीला
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड: शेतातील पीक,अवजारे , विहिरीतील मोटर चोरीला जाण्याच्या घटना नेहमी घडतात परंतु जमिनीत रुजलेली संत्रा झाडे चोरीला जाण्याचा अजब प्रकार नुकताच नरखेड येथे घडला.
पंजाबराव कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक जवाहर चरडे यांच्या नरखेड येथील शेत सर्व्हे न २०७ मध्ये जुलै महिन्यात ३५० नवीन संत्रा झाडे लावली. कृषी विद्यापीठाच्या वंडली फार्मवरून संत्र्याची ही पनेरी आणली होती. एकदीड फुटाचे खड्डे करून शेणखत व कीटकनाशके वापरून पनेरीची लागवड केली. ती संत्रा झाडे चांगली रुजलीही होती. परंतु २७ ऑगस्टच्या रात्री ३५० पैकी ५६ झाडे खोदून चोरून नेण्यात आली. विशेष म्हणजे शेताला तारेचे कुंपण केले होते तेही चोरट्यानी चोरून नेले. घटनेची तक्रार नरखेड पोलीस स्टेशनला केली असून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल मनोज गाडवे, अनिस शेख तपास करीत आहे. अजूनपर्यंत चोरट्याना शोधण्यास पोलिसांना यश आले नाही.