नातेसंबंधांना काळिमा
By Admin | Updated: August 30, 2014 02:41 IST2014-08-30T02:41:27+5:302014-08-30T02:41:27+5:30
जरीपटका येथील दोन अल्पवयीन मुलींना जन्मदाता पिता आणि भावानेच लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नातेसंबंधांना काळिमा
नागपूर : जरीपटका येथील दोन अल्पवयीन मुलींना जन्मदाता पिता आणि भावानेच लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेसंबंधांना काळे फासणाऱ्या या घटनांनी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
आरोपी पिता एका कारखान्यात मजुरी करतो. त्याचे दोन लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला १४ वर्षीय पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा आहे. आरोपी पिता हा मुलीला जेवणाचा डबा घेऊन कारखान्यात बोलवायचा आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. अनेक दिवस हा प्रकार सुरू होता. पीडित मुलीच्या भावाने हा प्रकार पाहिला तेव्हा त्याने बहिणीला वाचविण्याऐवजी तो सुद्धा तिला धमकावित तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान पीडित मुलीला दिवस गेले.
सूत्रानुसार काही दिवसांपूर्वीच पीडित मुलीच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला. परंतु बदनामीच्या भीतीने ती चूप होती. गुरुवारी पीडित मुलीला दिवस गेल्याचे परिसरातील नागरिकांना समजले. तेव्हा ते संतापले आणि त्यांनी पिता-पुत्राची धुलाई केली. दोन्ही आरोपींना पकडून यशोधरानगर पोलीस ठाण्यात आणले. घटनास्थळ लक्षात घेता त्यांना जरीपटका पोलिसांकडे सोपविण्यात आले. पीडित मुलीची विचारपूस केल्यानंतर तिच्या आईने तक्रार दाखल केली. त्या आधारावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना जरीपटका हद्दीतच गुरुवारी दुपारी घडली. पीडित १० वर्षीय मुलगी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरी होती. त्यावेळी घरी तिचे वडील होते. आई कामावर गेली होती. यादरम्यान वडिलाने मुलीवर बळजबरी केली. आई घरी आल्यावर मुलीच्या व्यवहारावरून तिला संशय आला. विचारपूस केली असता मुलीने घडलेली घटना सांगितली. तिच्या आईने शुक्रवारी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)