नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 22:42 IST2021-03-18T22:40:56+5:302021-03-18T22:42:17+5:30
Sticker on the home of a corona patient, Nagpur news गृहविलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. याचा विचार करता मनपा प्रशासनाने गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टीकर लावणे सुरू केले आहे.

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गृहविलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. याचा विचार करता मनपा प्रशासनाने गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टीकर लावणे सुरू केले आहे. स्टीकरवर पॉझिटिव्ह कोविड-१९ रुग्ण होम आयसोलेशन असे नमूद करून त्यामध्ये रुग्णाचे नाव व होम आयसोलेशनचा कालावधी (केव्हापासून केव्हापर्यंत) सुद्धा त्यामध्ये नमूद केले जात आहे.
मनपा आयुक्त राधकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपाच्या सर्व दहा झोन कार्यालयाअंतर्गत ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन करावे याबाबत मनपाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशानुसार गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर पाच हजार दंड तसेच पोलीस कारवाई केली जात आहे. सर्व झोनमध्ये सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी नियम निर्धारित करण्यात आले आहेत. अनेक कोरोनाबाधितांकडून गृह विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
झोन स्तरावर भरारी पथक
सक्तीने गृह विलगीकरणाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी झोन स्तरावर भरारी पथक (फ्लाईंग स्कॉड) गठित करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणाशिवाय गृह विलगीकरणातील कोरोनाबाधित घराबाहेर दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय ५ हजार दंडह वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.