काँग्रेसच्या अर्जासाठी चढा देवडियाची पायरी
By Admin | Updated: August 6, 2014 01:13 IST2014-08-06T01:13:53+5:302014-08-06T01:13:53+5:30
शहरातील सहापैकी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी हवी असेल तर इच्छुक उमेदवाराला देवडिया काँग्रेस भवनाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत.

काँग्रेसच्या अर्जासाठी चढा देवडियाची पायरी
आजपासून अर्ज वितरण : ११ पर्यंत मुंबईला पाठविणार
नागपूर : शहरातील सहापैकी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी हवी असेल तर इच्छुक उमेदवाराला देवडिया काँग्रेस भवनाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. येथे उद्या, बुधवारपासून १० आॅगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार आहेत.
देवडिया काँग्रेस भवनात एरवी आयोजित जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना मोजकेच पदाधिकारी उपस्थित असतात. स्वत:ला पक्षापेक्षा मोठे अनेक नेते तर वर्षानुवर्षे देवडिया काँग्रेस भवनाकडे फिरकूनही पाहत नाहीत. येथे आयोजित बैठकांना उपस्थितही राहत नाहीत. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज घेण्यासाठी त्यांना देवडियात यावे लागणार आहे. सरचिटणीस बंडोपंत टेंभूर्णे, डॉ. गजराज हटेवार, तुफैल अशर हे सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत अर्ज वितरित करतील. शहर काँग्रेसकडे भरून सादर केलेले अर्ज ११ आॅगस्टपर्यंत प्रदेश कार्यालयाकडे पाठविले जातील.
२००९ च्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते, तेथे उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी पाच हजार रुपयांचा तर महिला व आरक्षित वर्गासाठी २५०० रुपये पक्षनिधी म्हणून रोख किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करायचे आहेत. मतदारसंघ वाटपाच्या चर्चेत जर जुन्यापैकी काही मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडले गेले तर, त्या मतदारसंघासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांचे शुल्क परत केले जाणार आहे.
जे मतदारसंघ राष्ट्रवादी व मित्रपक्षांसाठी सोडले होते, त्या मतदारसंघासाठी अर्ज करताना कुठलेही शुल्क भरण्याची गरज नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस मागे राहिली. असे असले तरी सर्वच मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. हे पाहता बुधवारपासून देवडियामधील वर्दळ पुन्हा एकदा वाढणार आहे. (प्रतिनिधी)