राज्यातील १०० एसटी बसेसला ‘स्टील बॉडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:55 IST2019-07-27T13:53:54+5:302019-07-27T13:55:15+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला अॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडी देण्यात येत असून विभागातील १०० बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात जुन्या बसेसमध्ये खडखड आवाज येणार नाही, हे विशेष.

राज्यातील १०० एसटी बसेसला ‘स्टील बॉडी’
वसीम कुरेशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला अॅल्युमिनियमऐवजी स्टील बॉडी देण्यात येत असून विभागातील १०० बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात जुन्या बसेसमध्ये खडखड आवाज येणार नाही, हे विशेष.
एटी महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीच्या हिंगणा, नागपूर, औरंगाबाद, डोबाडी, पुणे येथील केंद्रीय कार्यशाळेत जुन्या बसेसला स्टील बॉडीत रुपांतर करण्याचे काम सुरू आहे. नागपूर विभागात १०० बसेसला स्टीलची बॉडी देण्यात आली आहे. अनेक अपघातात अॅल्युमिनियमची बॉडी लवचिक असल्यामुळे बसचे अधिक नुकसान होते. यात प्रवाशांची जीवितहानी अधिक होते. याशिवाय ‘अॅल्युमिनियम पॅनल रिपीट’ प्रवासात निघून बसेसमध्ये खडखड आवाज येतो. स्टील बॉडीत ही समस्या येत नसून अपघातातही अधिक नुकसान होत नाही. स्टील बॉडीत बसच्या सीटला आरामदायी बनविण्यात आले आहे. अॅल्युमिनियमची बॉडी असल्यामुळे सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु आता एसटी महामंडळ खासगी बसेसच्या तुलनेत स्टील बॉडीच्या बसेस रस्त्यावर उतरवित आहे. बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्याचे काम तीन वर्षांपासून करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. लोखंडाची बॉडी असल्यामुळे बसेसचे अॅव्हरेज कमी मिळत होते. परंतु स्टील बॉडीमुळे अधिक अॅव्हरेज मिळणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
‘एसटीच्या प्रवासात प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. याच बाबीकडे लक्ष देऊन एसटी बसेसला स्टील बॉडीत रुपांतरीत करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने जुन्या बसेस स्टील बॉडीत रुपांतरित करण्यात येतील.’
अशोक वरठे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग