उपराजधानीत राज्य कुणाचे
By Admin | Updated: October 7, 2015 03:17 IST2015-10-07T03:17:05+5:302015-10-07T03:17:05+5:30
नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी.

उपराजधानीत राज्य कुणाचे
क्राईम ग्राफ वाढतोय : पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही
लोकमत विशेष
नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचाही पदभार आहे. त्यामुळे त्यांच्या होमटाऊनमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चांगली असावी. येथील पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क असायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळल्यासारखी झाली आहे. गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव सध्या आजारी रजेवर आहेत. २६/११ च्या हल्ल्यात मोलाची भूमिका वठविणारे राजवर्धन सिन्हा यांच्याकडे आयुक्तांचा प्रभार आहे. त्यांच्या साथीला शांतपणे कोणतीही स्थिती हाताळण्याचे कसब असलेले अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आहेत. अभिनाशकुमार, इशू सिंधू, दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, शैलेश बलकवडे सारखे नव्या दमाचे पोलीस उपायुक्त आहेत. असे असूनही शहरातील गुंड, जुगारी आणि बुकी मोकाट सुटल्यासारखी स्थिती आहे, असे का होत आहे, ते कळायला मार्ग नाही.
अधिकारी दडपणात आहे का ?
गेल्या दोन दिवसांपासूनं नागपुरात असलेले पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्देशून लोकाभिमुख होऊन काम करावे, असे म्हटले आहे. लोकांमध्ये मिसळून काम करा असा सल्ला देतानाच कुणाच्या दडपणात काम करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सुचवले आहे. त्यांच्या या सूचनेत अनेक अर्थ दडले आहेत. त्याचमुळे शहरात अनेक चांगले पोलीस अधिकारी असूनही गुन्हेगारी वाढत असल्याने या अधिकाऱ्यांवर दडपण आहे का, असा प्रश्न चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेक मोठ्या कारवायांच्या वेळी काही पोलीस अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात आले होते, हे सर्वश्रुत आहे. हे दडपण ‘त्या’ प्रकरणापुरतेच होते की कायम या अधिकाऱ्यांना दडपणात ठेवण्यात येते, की हे अधिकारीच आता ‘कुछ कर दिखाना नही’, अशा मानसिकतेतून जात आहे, ते तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे, पण...
राज्याप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वत:च्या गृहशहराकडेही लक्ष आहे. येथील वातावरण चांगले राहावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ते खास नजर ठेवून असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची प्रचितीही आली. दहशतवादी हल्ला किंवा जातीय दंगलीचा धोका असल्यामुळे त्यांनी नागपूरवर बारीक लक्ष ठेवले होते. येथे राज्याचे अतिरिक्त महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीन बिहारी यांना येथे खास पाठवले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी असेच लक्ष नेहमी ठेवण्याची गरज आहे. शहरातील निष्क्रिय, भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला, त्यांचे रिपोर्ट कार्ड तपासले गेले तरच गुन्हेगारांची पिलावळ वळवळणार नाही. खून, बलात्कार, खंडणी वसुलीसारखे गंभीर गुन्हे करण्यासोबत पत्रकारांवर हल्ले करण्याची, धमकी देण्याची, सामान्यजनांची वाहने जाळण्याची, उद्योजकांवर हल्ले करण्याची गुंड हिंमत करणार नाहीत.
येथे मिळाले यश!
एकीकडे गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असताना पोलिसांनी केलेल्या चांगल्या प्रयत्नांमुळे शहरातील चेनस्रॅचिंगच्या घटना मात्र कमी झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात नागपुरात चेनस्रॅचर्सनी अक्षरश: हैदोस घातला होता. दरदिवशी किमान दोन ते तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडत होत्या. परिणामी महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी नियोजनपूर्ण कारवाई केल्यामुळे चेनस्रॅचिंगच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे. त्यामुळे या बाबतीत पोलीस प्रशंसेला पात्र ठरतात.