विद्यापीठे-महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:41+5:302021-04-30T04:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे. कोरोनाची सध्याची स्थिती ...

विद्यापीठे-महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला लवकरच सुरुवात होणार आहे. कोरोनाची सध्याची स्थिती पाहता जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यभरातील लसीकरण केंद्रांमध्ये सरकारने वाढ करावी. तसेच राज्यातील सर्व विद्यापीठे, प्रमुख महाविद्यालये, शिक्षण संस्थांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने नियोजन केले पाहिजे. लसीकरणाच्या मोहिमेत एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस अशा सर्व उत्तीर्ण डॉक्टरांना सहभागी करून घ्यावे. तसेच पॅरामेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचेदेखील सहकार्य घ्यावे. इतर कामासाठी एनएसएस, एनसीसीसह अभाविप व सामाजिक संस्थांच्या संघटनांची मदत घ्यावी, अशी मागणी अभाविपने केली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले पाहिजे. शिवाय राज्यातील काही गावे दुर्गम भागात आहेत. यासाठी विशेष योजना बनवून सर्व सुविधांनी सज्ज वाहनांद्वारे मोहीम राबविण्यात यावी. तसेच घरकाम करणाऱ्या महिला व कामगारांना प्राथमिकतेने लस द्यावी. लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी किंवा त्यांच्यासाठी लसीकरणाचे दिवस राखीव असावेत, अशी मागणी विदर्भ प्रदेश मंत्री अखिलेश भारतीय यांनी केली आहे.