‘पॉलिटेक्निक’च्या प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ
By Admin | Updated: June 28, 2014 02:34 IST2014-06-28T02:34:28+5:302014-06-28T02:34:28+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘पॉलिटेक्निक’च्या प्रवेशप्रक्रियेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रवेशप्रक्रियेस म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

‘पॉलिटेक्निक’च्या प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ
नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘पॉलिटेक्निक’च्या प्रवेशप्रक्रियेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी या प्रवेशप्रक्रियेस म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी नेमके किती अर्ज प्राप्त झाले याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु ‘अप्लिकेशन किट’ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची ‘एआरसी’वर (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) फारशी गर्दी झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील काही महत्त्वाच्या ‘एआरसी’वर सकाळपासूनच काही प्रमाणात विद्यार्थी दिसून येत होते. मात्र इतर ठिकाणी शुकशुकाटच दिसून आला. साधारणत: दोन दिवसात प्रवेशप्रक्रियेला वेग येईल, अशी आशा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप राऊंडचे वेळापत्रक मागील आठवड्यातच जाहीर करण्यात आले. महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्जदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना हे अर्ज आॅनलाईन भरायचे असून एआरसी केंद्रांवर जाऊन ‘कन्फर्म’ करायचे आहेत.
पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेत चार प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. चौथ्या फेरीत मात्र समुपदेशनाद्वारे प्रक्रिया राबविली जाईल. दुसऱ्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. याबद्दलची आणखी माहिती विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. नागपूर विभागातील सर्व ७१ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २४,६५५ जागा उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)