एसटी कार्यशाळेतील कर्मचारी कोरोना संक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:34+5:302021-04-20T04:09:34+5:30
- शासन नियमाला दाखवला जातोय ठेंगा : शंभर टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचा वेग ...

एसटी कार्यशाळेतील कर्मचारी कोरोना संक्रमणाच्या विळख्यात
- शासन नियमाला दाखवला जातोय ठेंगा : शंभर टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा वेग बघता आणि टाळेबंदीचे नियम सांगून राज्य शासनाने सर्व शासकीय व शासन अंतर्गत येणाऱ्या महामंडळांना कार्यालयात कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे जाहीर केले आहे. मात्र, राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा येथे या नियमाचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. सोबतच वरचेवर कर्मचारी संक्रमित आढळत असल्याने, उर्वरित कर्मचारी संक्रमणाच्या धोक्यात आले आहेत.
हिंगणा येथील कार्यशाळेत २७५च्या जवळपास कर्मचारी आहेत. येथील ३०च्या वर कर्मचारी संक्रमित आढळले आहेत तर काहींचे कुटुंबीय कोरोनाने बाधित आहेत. अनेकांना सौम्य ते तीव्र लक्षणे आढळत असतानाही ते अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्यास कचरत आहेत. अशा स्थितीत जे कर्मचारी सद्य:स्थितीत सुदृढ आहेत, त्यांना धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड बोलाविण्यात येत असताना तांत्रिक कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थितीचा आग्रह का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मध्यवर्ती विभागीय कार्यशाळा व वर्धा विभागीय कार्यशाळेत ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीचा नियम पाळला जात असताना हिंगणा येथील कार्यशाळेत हा नियम का पाळला जात नाही, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे. मात्र, कारवाईच्या भीतीने कोणताही कर्मचारी याबाबत आवाज उठविण्यास पुढाकार घेत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
..................