नागपूर : एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील २,५४५ कर्मचाऱ्यांच्या मार्च आणि एप्रिलच्या वेतनातून एलआयसीचे पैसे कपात करण्यात आले. परंतु हे पैसे एलआयसीकडे भरण्यात आले नसल्याने हे पैसे त्वरित न भरल्यास एसटी कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ६८० चालक, २३५ चालक कम वाहक, ७३० वाहक, ३५० प्रशासकीय कर्मचारी आणि ५५० यांत्रिक कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या वेतनातून एलआयसीचे पैसे कपात करण्यात आले. परंतु हे पैसे एलआयसीकडे भरण्यात आले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. एलआयसीकडे पैसे न भरल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची पॉलिसी कालबाह्य होईल आणि एलआयसी संबंधित कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही. यात कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई एसटी महामंडळाने संबंधित कर्मचाऱ्याला द्यावी आणि पैसे न भरणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने केली आहे. महामंडळाने त्वरित पैसे न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
..........
पैसे न भरणे चुकीचे
‘कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एलआयसीचे पैसे कपात केल्यानंतर हे पैसे एलआयसीमध्ये न भरणे चुकीचे आहे. यात कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पैसे न भरणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.’
-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
..........