एस.टी. कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद

By Admin | Updated: April 9, 2016 03:22 IST2016-04-09T03:22:08+5:302016-04-09T03:22:08+5:30

एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पर्यंतचा प्रवास मोफत करण्यास मुभा देण्यात आली होती.

S.T. Stop telling employees 'staff' | एस.टी. कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद

एस.टी. कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद

कर्मचाऱ्यांना लागणार प्रवास भाडे : प्रवाशांना मोजावा लागणार अतिरिक्त एक रुपया
कैलास निघोट देवलापार
एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५० कि.मी.पर्यंतचा प्रवास मोफत करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे सदर कर्मचारी वाहकाला कुठे जावयाचे आहे, हे सांगण्याऐवजी केवळ ‘स्टाफ’ म्हणायचे. महामंडळाने ही सवलत मोडित काढण्याचा निर्णय घेतल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांना या प्रवासासाठी प्रवासभाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ‘स्टाफ’ सांगणे बंद होणार आहे. शिवाय, प्रत्येक प्रवाशाला त्याच्या प्रवासभाड्याव्यतिरिक्त एक रुपया जास्तीचा मोजावा लागणार आहे. या एक रुपयाचे त्यांना वेगळे तिकीटही दिले जाणार आहे.
या निर्णयाचा महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी नुकताच आदेश जारी केला असून, हा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाला लागू राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. विना तिकीट प्रवास करणे, प्रवासाची विहीत मोफत पास, कार्यालयीन कामानिमित्त देण्यात येणाऱ्या अधिकृत पासेस, कर्मचाऱ्यांचे प्रवाशांसोबत असौजन्यपूर्ण वर्तन यासह अन्य बाबींमुळे महामंडळाला उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच कर्मचाऱ्याचा प्रवाशांशी होणाऱ्या वादामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ६ ते १२ एप्रिल या काळात विशेष मार्ग तपासणी केली जाणार असून, त्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
दुसरीकडे, राज्य परिवहन महामंडळात अनेक कर्मचारी कमी वेतनावर कित्येक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यासाठी आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी आश्वासने देऊनही त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली नाही, अशा प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. सोबत प्रत्येक प्रवाशाकडून प्रवासभाड्याव्यतिरिक्त एक रुपया अधिक घेतला जाणार आहे. या एक रुपयाचे त्यांना वेगळे तिकीट दिले जाणार आहे. आधीच प्रवासभाडे वाढविण्यात आले. यासाठी प्रसंगी डिझेल दरवाढीचे कारण पुढे करण्यात आले. डिझेलचे दर कमी होऊनही तिकिटांचा दर कायम ठेवण्यात आला. ग्रामीण भागात बसफेऱ्यांची अनियमितता वाढली आहे. त्यातच प्रवाशांना एक रुपया अतिरिक्त मोजावा लागणार असल्याने प्रवाशांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. प्रवाशांसाठी हा निर्णय नवीन असल्याने बहुतांश प्रवासी वाहकांसोबत वाद घालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.

महिन्याकाठी २० कोटी रुपये जमा
एस.टी. महामंडळाच्या बसेसनी रोज राज्यभर किमान ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांकडून एक रुपया वसूल केल्यास महामंडळाकडे रोज ६५ लाख रुपये गोळा होणार आहेत. महिन्याकाठी ही रक्कम २० कोटी रुपयांच्या घरात जाते. ही रक्कम महामंडळाला मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या एक रुपयातून प्रवाशांना विम्याचा कोणता लाभ मिळणार आहे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले नाही. हा विमा अपघाती आहे की अन्य आहे, त्या विम्याचा लाभ मिळविण्यासाठी त्या प्रवाशाला एक रुपयाचे तिकीट जपून ठेवावे लागगणार की नाही, यासह अन्य महत्त्वाच्या बाबी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्या नाहीत.

एक प्रवासी; दोन तिकिटे
राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांच्या नवीन आदेशान्वये प्रत्येक प्रवाशाला आता दोन तिकिटे मिळणार आहेत. यातील एक तिकीट त्याच्या प्रवासभाड्याचे तर दुसरे तिकीट त्याच्याकडून घेतलेल्या एक रुपयाचे असणार आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा इतर सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्यांनाही एक रुपया द्यावा लागणार आहे. हा एक रुपया फक्त एका वेळच्या प्रवासाचा असणार आहे. हा एक रुपया त्या प्रवाशाच्या विम्यापोटी घेतला जात असल्याची माहिती वाहकांकडून प्रवाशांना दिली जात आहे. या एक रुपयात त्या प्रवाशाचा १० लाख रुपयांचा विमा असणार आहे, असेही वाहकांनी सांगितले.

Web Title: S.T. Stop telling employees 'staff'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.