लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक तंगीमुळे पगाराचे वांदे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढल्याने अडचणीत आलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनाने १२० कोटींचा निधी दिला आहे. यातून एसटी महामंडळाने आपला खर्च भागविण्याची सूचनाही शासनाने केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, एसटीकडे आता प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढल्याने एसटीच्या तिजोरीत चांगली भर पडत आहे. असे असूनही एसटीचे इतर खर्च भागविताना महामंडळाची दमछाक होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वेळोवेळी वांदे होत आहेत.
मार्च महिन्याचा पगार देतानाही असेच झाले. एसटी महामंडळाकडे निधीच नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या रकमेपैकी केवळ ५६ टक्केच पगाराचे वाटप एसटीने केले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. ते आंदोलनाच्या पवित्र्यात आले. राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये त्यासंबंधाने कुरबुर सुरू असल्याचे लक्षात आल्याने महामंडळाकडून राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी महाराष्ट्र शासनाने एसटीच्या पदरात १२० कोटींचा निधी घातला. तसे परिपत्रक एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर व्हायरल झाले. या रकमेतून कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या उर्वरित पगाराचे वितरण होणार आहे. त्यासाठी विभागनिहाय स्तरावर अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
सुट्यांमुळे वाढली प्रतीक्षासरकारने निधीची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांच्या पगाराची शिल्लक रक्कम मंगळवार किंवा त्यानंतरच पडू शकेल. कारण शनिवार ते सोमवार सुट्यांमुळे सरकारी कोषागार बंद राहील. परिणामी एसटीच्या कर्मचाऱ्यांना शिल्लक असलेला पगार घेण्यासाठी आणखी तीन दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.
"एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी असेल. आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना एप्रिलमध्ये वेतन केवळ ५६ टक्केच देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, यापुढे पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल."- प्रताप सरनाईक परिवहनमंत्री