एसटी महामंडळाचा मनपाला झटका
By Admin | Updated: June 11, 2015 03:01 IST2015-06-11T03:01:48+5:302015-06-11T03:01:48+5:30
शहर बस सेवेसाठी मोरभवनची जागा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे.

एसटी महामंडळाचा मनपाला झटका
मोरभवनातील भूमिपूजन कार्यक्रम रद्द :
मनपाने एसटीची परवानगीच घेतली नाही
नागपूर : शहर बस सेवेसाठी मोरभवनची जागा मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. महापालिकेतर्फे गुरुवारी मोरभवनातील तीन प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी महापौरांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार होते. मात्र, यासाठी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे.
वृत्तपत्रांच्या माध्यमातून भूमिपूजनाचे वृत्त कळताच एसटी ने बुधवारी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले. यावर उत्तर देताना आयुक्तांनी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. मोरभवनच्या जागेवरून एसटी व महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून रस्सीखेच सरू आहे. जागा वाचविण्यासाठी एसटीने मोरभवन येथून ग्रामीण बस फेऱ्या सुरू केल्या. शहरातील १६ ठिकाणी असलेल्या बस स्टॅण्डची मालकीही सोडली नाही. यामुळे शहर बस रस्त्यावर पार्क केल्या जात आहेत. १५ आॅक्टोबर २००८ रोजी महापालिकेच्या सभेत ठराव मंजूर करीत मोरभवनला सिटी ट्रान्सपोर्ट स्टॅण्डचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. २४ डिसेंबर २०१० च्या सभेत पुन्हा हा प्रस्ताव पारित करण्यात आला. या प्रस्तावात महापालिकेने शहरातील सर्वच एसटी स्टॅण्ड महापालिकेला सोपविण्यासाठी नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. यावर राज्य सरकार ने नगर रचनेच्या माध्यमातून सूचना व आक्षेप मागविले. मात्र, आजवर सूचना व आक्षेप मिळाले नाही. या आधारावर २९ आॅक्टोबर २०१२ रोजी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, काहीच कार्यवाही न झाल्यामुळे समस्या कायम राहिली. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नगर विकास मंत्रालयाने अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. लवकरच अधिसूचना जारी होणार आहे. असे असले तरी मोरभवनचा ताबा वाचविण्यासाठी एसटी महामंडळाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
मालकी एसटीची
एसटीचे स्टॅण्ड व डेपोची मालकी एसटीची आहे. याबाबत बुधवारी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले होते. या पत्राच्या उत्तरात त्यांनी फोन करून कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. यानंतरही मोरभवनमध्ये भूमिपूजन करण्यात आले तर राज्य सरकारला पत्र पाठवून तक्रार केली जाईल. भूमिपूजन कार्यक्रमाची कुठलीही माहिती एसटी महामंडळाला नव्हती. बुधवारी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांवरून ही माहिती मिळाली.
- राजीव घाटोळे, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर