भावपूर्ण सादरीकरणाने रंगलेली ‘श्रीकृष्ण गीतांजली’

By Admin | Updated: August 14, 2014 01:24 IST2014-08-14T01:24:36+5:302014-08-14T01:24:36+5:30

भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते.

'Sri Krishna Gitanjali' painted with a devotional presentation | भावपूर्ण सादरीकरणाने रंगलेली ‘श्रीकृष्ण गीतांजली’

भावपूर्ण सादरीकरणाने रंगलेली ‘श्रीकृष्ण गीतांजली’

स्वरतरंग म्युझिक अकॅडमी : भक्तिरसात रसिक झाले चिंब
नागपूर : भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारतीयांचे आवडते दैवत. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आणि जीवनाचा अर्थ कळतो तो श्रीकृष्णचरित्रातून. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची मोहिनी कायम भाविकांना पडते. त्यामुळे भगवान कृष्णाची जन्माष्टमीही भाविक मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. जन्माष्टमी लवकरच येणार आहे. यानिमित्ताने भगवान कृष्णाच्या चरित्राचे गायन करणाऱ्या ‘श्रीकृष्ण गीतांजली’ हा कार्यक्रम आज सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला.
स्वरतरंग संगीत अकादमीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संचालक निरंजन बोबडे यांची होती. ही श्रीकृष्ण गीतांजली चंद्रशेखर वराडपांडे उपाख्य कमलासूत यांनी रचली आहे. विशेषत: या गीतांजलीचा हा पाचवा नागपुरातील कार्यक्रम असूनही रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
भगवान श्रीकृष्णाच्या गीतांचे सुरेल सादरीकरण आणि ज्या प्रसंगावर गीत आधारित आहे तो प्रसंग एलसीडी स्क्रीनद्वारे प्रदर्शित करण्यात येत असल्याने रसिकांना या कार्यक्रमाचा अधिक आनंद घेता आला. आपण साक्षात द्वारकेत कृष्णाच्या राज्यात असल्याचाच भास यावेळी निर्माण करण्यात सारेच कलावंत यशस्वी ठरले. त्यात राजेश अमीन यांनी रंगमंचाची सुबक सजावट केल्याने वातावरणनिर्मिती साधली गेली. किशोर गलांडे आणि स्नेहल खंडकर यांचे विवेचनात्मक भाष्य गीतांचा परिणाम वाढविणारे होते. निरंजनने ‘कथा ही निर्मल भक्तीची...’ या गीताने प्रारंभ केला आणि त्यानंतर सारेच श्रोते कृष्णभक्तीत तल्लीन झाले. गायत्री गायकवाड आणि मंजिरी वैद्य यांनी ‘कृष्ण जन्मला ग सखे...’ हे गीत सादर करून कृष्णजन्माच्या आनंदात रसिकांना भिजविले. त्यानंतर श्रेया खराबे हिने ‘मोहक हे रूप तुझे...’ तर रघुनाथ बोबडे यांनी ‘जाहला कंसाचा संहार...’ आणि श्रीनिधी घटाटेने ‘रुक्मिणी महाराणी जाहली...’ हे गीत तयारीने सादर केले. याप्रसंगी ‘करू या गोवर्धन पूजन..., रसरंगी श्रीरंग रंगला..., अक्रूरा नेशी कुठे घनश्याम..., कलंक स्यमंतका..., सुदामा येई द्वारकापुरी..., दुष्ट तो कालयवन संपला..., वाचावी अब्रू यदुनाथा..., कृष्णा सांगितली गीता...’ आदी गीते सादर करण्यात आली. ‘ओम नमो भगवते वासुदेवा...’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमात भानुदास कुळकर्णी, पंकज यादव, श्रीकांत सूर्यवंशी, अक्षय आचार्य, सुभाष वानखेडे, सुमंत बोबडे, अरविंद उपाध्ये यांनी विविध वाद्यांवर साथसंगत केली. ध्वनी स्वप्नील उके यांचा तर व्हिडिओ संयोजन जावेद शेख यांचे होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sri Krishna Gitanjali' painted with a devotional presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.