Nishant Agarwal brahmos: पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात टाकणारा ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अगरवाल (२८) याने जन्मठेपेसह इतर शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्याच्या अपीलावर गुरुवारी (२५ एप्रिल) न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निशांत अगरवाल नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार (उत्तराखंड) येथील मूळ रहिवासी असून तो भारत व रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस कंपनीच्या नागपुरातील प्रकल्पामध्ये सिस्टिम इंजिनिअर पदावर कार्यरत होता आणि उज्ज्वलनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता.
सत्र न्यायालयाने त्याला ३ जून २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्यातील कलम ३ (१) (सी) अंतर्गत १४ वर्षे सश्रम कारावास तर, कलम (१) (ए) (बी) (सी) (डी) आणि कलम ५ (३) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
लखनौ एटीएस पथकाची कारवाई
पाकिस्तानमधून नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने फेसबुक तर, सेजल कपूर नावाने लिंक्ड-इन अकाउंट संचालित केले जात होते.
अग्रवालसह भारताच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचारी या गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याची माहिती लखनौ एटीएस कार्यालयाला मिळाली होती. त्यानंतर अग्रवालला ८ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक करण्यात आली.