गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट
By Admin | Updated: July 25, 2015 03:02 IST2015-07-25T03:02:34+5:302015-07-25T03:02:34+5:30
याकूबची फाशी अतिसतर्क राहा सामाजिक सलोखा कायम राखा

गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट
नरेश डोंगरे नागपूर
याकूबच्या फाशीच्या अनुषंगाने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा राज्य गुप्तचर यंत्रणेने राज्यातील पोलीस यंत्रणेला दिला आहे. एवढेच नव्हे तर, सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी अतिसतर्क राहा आणि खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणा, असे आदेश शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
खास सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईहून जारी झालेल्या या अलर्टमध्ये याकूबच्या फाशीच्या अंमलबजावणीनंतरच्या संभाव्य स्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा संमत झाला. त्यामुळे एका विशिष्ट वर्गात तीव्र नाराजी आहे. त्यात आरक्षणाचेही भिजत घोंगडे असल्यामुळे राज्यातील विशिष्ट गटात नाराजीचा सूर आहे. अशात याकूबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर काय होऊ शकते, त्याचा अंदाज घेऊन पोलिसांना सतर्क राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक सौहार्द्रता धोक्यात येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ऐनवेळी धावपळ करण्याऐवजी आधीपासूनच सामाजिक सलोखा जपण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूर शहरासह सर्वच भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची यादीच बनविणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी आणि शनिवारी शिर्षस्थ अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि हे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत असून, काहींनी खबरदारीच्या उपाययोजनांचे आदेश दिले आहे.
समाजकंटकांवर विशेष लक्ष
सामाजिक सलोखा कसा जपता येईल, त्याबाबत वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.ठिकठिकाणच्या समाजकंटकांवर तपास यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहे. दरम्यान, याकूबच्या फाशीच्या संबंधाने निर्माण झालेल्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. एसआयडीचे स्थानिक अधिकारी, कर्मचारी सकाळपासून रात्रीपर्यंत कारागृहाच्या परिसरात हजर असतात. परिसरात येणाऱ्या प्रत्येकाच्या हालचाली टिपण्यासोबत त्यांच्याकडून काही माहिती मिळते काय, त्याचीही चाचपणी ही मंडळी करीत आहे. कारागृहातून पेशीवर नेल्या जाणाऱ्या कैद्यांकडून आतमधील स्थितीचा आढावा घेण्याचीही या मंडळीची धडपड दिसते.
उपराजधानीतील सामाजिक सलोखा नेहमीप्रमाणेच कायम राहील. येथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही निर्माण होणार नाही. मात्र, तसे काही झाल्यास आम्ही पूर्णपणे सज्ज असून, समाजात तेढ निर्माण करू पाहाणाऱ्या समाजकंटकांना पोलीस नेहमीसाठी धडा शिकवतील.
- शारदा प्रसाद यादव
पोलीस आयुक्त, नागपूर.
नागपूर जिल्ह्यातील सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व सामाजिक नेते, कार्यकर्त्यांची त्यासाठी मदत घेतली जात असून, जिल्ह्यात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची पूर्ण खात्री आहे. दुर्दैवाने कुणी तसे प्रयत्न केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. आरती सिंग
पोलीस अधीक्षक, नागपूर