लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : महिलेने स्वयंपाक आटाेपल्यानंतर गॅस बंद केला आणि पूजा करायला सुरुवात केली. काही वेळातच गॅसचा स्फाेट झाला. यात स्वयंपाकाचा ओटा व खिडक्यांच्या तावदानांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना शीतलवाडी-परसाेडा (ता. रामटेक) येथील गुरुकुलनगरात शनिवारी (दि. १३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
प्रकाश जंगले, रा. गुरुकुलनगर, शीतलवाडी- परसाेडा, ता.रामटेक यांच्या पत्नीने शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला. त्यानंतर, त्यांनी गॅस व्यवस्थित बंद करून पूजा करायला बसल्या. त्यांच्याकडील देवघर हे स्वयंपाकघरातच आहे. पूजा करीत असताना अचानक स्फाेट झाल्याने त्या घाबरल्या, परंतु त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, या स्फाेटामुळे स्वयंपाकाच्या ओट्यावरील कडप्पा तुटला असून, खिडकीची तावदाने फुटली शिवाय ओट्याला खाली लावलेले लाकडाचे पल्लेही निखळून बाजूला फेकले गेले.
प्रकाश जंगले यांनी लगेच या प्रकाराची माहिती गॅस कंपनीच्या वितरकाला दिली. वितरकाकडील कर्मचाऱ्यांनी प्रकाश जंगले यांचे घर गाठून गॅस सिलिंडर व रेग्युलेटरची तपासणी केली. या दाेन्हीही बाबी व्यवस्थित असल्याची माहिती त्या कर्मचाऱ्याने दिली. वायुगळतीमुळे हा स्फाेट घडला असावा, अशी शक्यताही त्या कर्मचाऱ्याने व्यक्त केली. या स्फाेटात पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रकाश जंगले यांनी दिली.
हल्ली सिलिंडरमधील वायुगळती ही धाेकादायक असली, तरी ती सामान्य बाब झाली आहे. कधी सिलिंडरमध्ये वायसर नसताे, तर कधी गॅस वहनाची पाइप लिकेज अथवा खराब असते. त्यामुळे संभाव्य धाेका टाळण्यासाठी गॅस वितरकाने ग्राहकांना सिलिंडर तपासून द्यावे, तसेच नागरिकांनी सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, शेगडी या वस्तूंची वारंवार तपासणी करावी, असे आवाहन रामटेक शहरातील जाणकार व्यक्तींनी केले आहे.
...
माेड्युलर किचन
प्रकाश जंगले यांच्या घरातील किचन हे माेड्युलर आहे. ज्या ठिकाणी सिलिंडर ठेवले जाते, ताे कप्पा पूर्णपणे बंद असून, त्या कप्प्याला लाकडाची छाेटी दारे लावली आहेत. त्यामुळे आत गॅसची गळती झाल्यानंतरही बाहेर कुणाला गॅसचा वास आला नाही. गॅस कप्प्यात ठच्च भरल्यानंतर बाहेर निघायला जागा नसल्याने त्याचा स्फाेट झाला. त्यामुळे सिलिंडर व त्याचे रेग्युलेटर स्फाेट झाल्यानंतरही व्यवस्थित राहिले, शिवाय कुणालाही दुखापत झाली नाही.