धम्मचक्र प्रवर्तन दिन - प्रशासन लागले कामाला
By Admin | Updated: September 11, 2014 01:08 IST2014-09-11T01:08:33+5:302014-09-11T01:08:33+5:30
येत्या ३ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी व कामठी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभात येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सोयीच्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या

धम्मचक्र प्रवर्तन दिन - प्रशासन लागले कामाला
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक
नागपूर : येत्या ३ आॅक्टोबर रोजी दीक्षाभूमी व कामठी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभात येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सोयीच्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व व्यवस्थेच्या पूर्वतयारीबाबत बुधवारी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी राहुल रेखावार, माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्यासह शासनातील विविध विभागीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत दीक्षाभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात दीक्षाभूमी परिसरात महापालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छतेकडे लक्ष घालून, भाविकांसाठी अस्थायी स्वरूपाचे शौचालये व स्नानगृह निर्माण करणे, वीज कंपनीमार्फत प्रकाश व्यवस्था, मनपा व परिवहन विभागातर्फे बसेसची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची चोख व्यवस्था ठेवणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अग्निशमन विभागाने सुरक्षा व्यवस्था तयार ठेवणे, आकस्मिक पाऊस आल्यास अनुयायांना थांबण्यासाठी शाळा व महाविद्यालयात व्यवस्था करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या व्यवस्था सांभाळण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागाकडून करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीचा तपशील तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, अशी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी सदानंद फुलझेले आणि अॅड. सुलेखा कुंभारे यांनी आयोजनाबाबत विविध सूचना केल्या. सदर सूचनांवर विचार करून तशी व्यवस्था निर्माण करण्यात येईल, असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले. तसेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या बौद्ध बांधवांच्या सोयी सुविधांबाबत पूर्वतयारी करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)