विकास कामांचा निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:57 PM2018-09-03T22:57:01+5:302018-09-03T22:58:30+5:30

Spend the development work fund before 30th December | विकास कामांचा निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा

विकास कामांचा निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा अंमलबजावणीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेला निधी योजनानिहाय कालबध्दपणे खर्चाचे नियोजन करतानाच संपूर्ण विकास निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. कामांची गती वाढवून सामान्य जनतेपर्यंत विकास कामे पोहचवा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण भागात रस्ते, पाणी, सिंचन, शिक्षण तसेच सामूहिक विकासाला प्राधान्य असलेल्या १४ प्रमुख विषयांचा विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती उपेश चव्हाण, पुष्पा वाघाडे, आशा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, विकास कामांची गती वाढवताना निर्णय घेताना होणारा विलंब टाळून प्रत्येक फाईलवर २४ तासात निर्णय घेऊन अंमलबजावणीला विलंब होणार नाही याची दक्षता विभाग प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे. अनावश्यक विलंब होणाऱ्या विकास कामाबद्दल जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

दररोज १०० घरांचे बांधकाम
प्रधानमंत्री ग्रामआवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाºया अडचणी सोडविल्यामुळे जिल्ह्यात दररोज १०० घरे पूर्ण करण्यात येत असून त्यापैकी १ हजार २०० घरे बांधून पूर्ण झाली आहे. घरकुल बांधकामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच गट-ड अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार घरकुल बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन अशा घरांना मान्यता देण्यासंदर्भातही यावेळी सूचना दिल्या.

६०० किमीचे रस्ते
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त कामांना मंजुरी दिली असून सुमारे ६०० किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. ही कामे निश्चित कालावधीत पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना नियमित बैठकी घ्याव्यात, अशा सूचना यावेळी दिल्यात.

दिव्यांगाना तात्काळ सायकली वितरित होणार
जिल्ह्यातील बाधित व अबाधित क्षेत्रातील दिव्यांगांना यंत्रावर चालणारी तीनचाकी सायकल देण्यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ४ कोटी ५० लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून दिव्यांगांना यांत्रिक तीनचाकी सायकलचे तात्काळ वितरण करण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याचे स्थानांतरण, अतिदुर्गम व आदिवासी भागातील शाळांना, अंगणवाड्यांना मदरडेअरीचे पौष्टिक दूध पुरविण्यात यावे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Spend the development work fund before 30th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.