लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी येथील आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे अतिवेगाने जाणाऱ्या कारमुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात तीन जण जखमी झाले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या या अपघातामुळे तीन वाहनांचा समोरून चेंदामेंदा झाला. बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
हा अपघात सकाळी ५:४५ वाजता घडला. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिंटू पुरुषोत्तम दाढे (३६, महर्षी दयानंद नगर, पाचपावली) हे त्यांच्या एमएच ४० बीजी ४९३१ या टाटा झेस्ट कारने झिरो माइल्सहून रहाटे कॉलनी चौकाकडे जात होते. लोकमत चौकाजवळ ते पोहोचले असता मागून आलेल्या काळ्या रंगाच्या फोक्सवॅगन कारने वेगाने त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रहाटे कॉलनी चौकाकडून एमपी २६ जी ४४३९ हे मालवाहतूक वाहन येत होते. अक्षय जुगन धुर्वे (२३, रामपूर, छिंदवाडा, मध्यप्रदेश) हा ते वाहन चालवत होता. फोक्सवॅगन कार त्या वाहनावर आदळली. वेग जास्त असल्यामुळे काळी कार घासत गेली व यु टर्न घेत पिंटू यांच्या कारलादेखील धडकली. अपघात इतका जोरात झाला होता की, फोक्सवॅगन कार तसेच मालवाहतूक वाहनाच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. फोक्सवॅगनमधील संबंधित कारचालक व शेजारी बसलेल्या सहप्रवाशासह मालवाहतूक वाहनातील चालक गंभीर जखमी झाले. तर दाढे हे व त्यांच्या कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले.
घटनास्थळावरील नागरिकांनी लगेच बजाजनगर पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व जखमींना उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर लॉरीच्या सहाय्याने नुकसान झालेली तीनही वाहने बजाजनगर पोलिस ठाण्यात नेऊन मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. उड्डाणपुलावर अपघातस्थळी ऑइल तसेच काचांचा खच पडला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती स्थिर आहे. फोक्सवॅगन कारच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.