तपासाला अधिक गती द्या!

By Admin | Updated: December 16, 2015 03:15 IST2015-12-16T03:14:03+5:302015-12-16T03:15:32+5:30

नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २८ महिने आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला १० महिन्यांचा कालावधी लोटला असताना आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येऊ शकले नाही.

Speed ​​up the probe! | तपासाला अधिक गती द्या!

तपासाला अधिक गती द्या!

दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण : कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गणेश खवसे  नागपूर
नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २८ महिने आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला १० महिन्यांचा कालावधी लोटला असताना आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येऊ शकले नाही. त्यामुळे असंतोष वाढत चालला आहे. हे पाहता या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करण्यात यावा, अशी मागणी दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केली असून याबाबत कुटुंबीयांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली.

दोन्ही विचारवंतांची हत्या होऊन मोठा कालावधी लोटूनही आरोपी पकडले न गेल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. हमीद दाभोलकर आणि मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत छोटेखानी बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनाला एवढ्या महिन्यांचा कालावधी लोटला असताना त्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातल्या त्यात केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणेमध्ये योग्य समन्वय नाही.
समन्वयाचा अभाव असल्याने आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी जात आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, जी चौकशी समिती शासनाने नेमली आहे; त्यातील अधिकाऱ्यांवर ही चौकशी करण्याव्यतिरिक्त नियमित कामांचा बोजा आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा एकीकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. यासाठी शासनाने केवळ या खुनांचा तपास करण्यासाठी विशेष अशा पथकाची नेमणूक करणे गरजेचे आहे, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी विधानभवनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना केली. त्यांच्यासोबत कॉ. पानसरे यांची स्नुषा मेघा पानसरे यासुद्धा उपस्थित होत्या.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांच्या तपासावर समाधानी आहात का, असा प्रश्न हमीद आणि मेघा पानसरे यांना विचारला असता तपासावर समाधानी होण्याचे कारणच नाही असे सांगत एवढा कालावधी खूप झाला. या कालावधीमध्ये तपासाच्या मुळापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही, हे खरेच क्लेषदायक आहे.
दोन विचारवंतांची हत्या झाली असताना त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता न येणे हे खरेच गंभीर आहे, असेही हमीद यांनी सांगितले.

सक्षम अधिकाऱ्यांची नावे सूचवा
कॉ. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणारे कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची तपास होण्यापूर्वीच बदली करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास थंडावल्याचा आरोप होत आहे. अशात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी याबाबत माहिती असलेलाच सक्षम अधिकारी व्यवस्थितरीत्या तपास करू शकतो, हे डॉ. हमीद दाभोलकर आणि मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आणून दिले. त्यावर सक्षम अशा अधिकाऱ्यांची तुम्हीच नावे सुचवा, अशीे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्याचे हमीद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शिना बोरा हत्याकांडात जलदगती कशी?
शिना बोरा हत्याकांड हे लब्धप्रतिष्ठितांशी संबंधित असे प्रकरण होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करीत असताना त्या प्रकरणातील आरोपींना अटक करून चार्जशिटही दाखल केली. दुसरीकडे विचारवंतांचा खून होऊनही तेवढी तत्परता पोलिसांना दाखविली नाही, असा दुजाभाव कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Speed ​​up the probe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.