‘इंद्रधनुष्य’ची दिमाखदार सुरुवात
By Admin | Updated: January 23, 2016 02:56 IST2016-01-23T02:56:31+5:302016-01-23T02:56:31+5:30
सळसळता उत्साह, कलात्मक रचनेतून सृजनात्मक निर्मिती करण्याची उमेद, अहोरात्र केलेली मेहनत व जिद्दीतून यश खेचून आणण्याचा विश्वास.

‘इंद्रधनुष्य’ची दिमाखदार सुरुवात
राज्यभरातील कलावंत विद्यार्थ्यांची मांदियाळी : नरेंद्र जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर : सळसळता उत्साह, कलात्मक रचनेतून सृजनात्मक निर्मिती करण्याची उमेद, अहोरात्र केलेली मेहनत व जिद्दीतून यश खेचून आणण्याचा विश्वास. निकोप स्पर्धेचा संकल्प घेऊन आलेल्या राज्यभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचा मंच प्रदान करणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’च्या पहिल्या दिवशी उपराजधानीने एक अनोखे वातावरण अनुभवले.
आयुष्यात यश मिळविण्यासाठी सर्वच जण धावत असतात. परंतु यशाचे शिखर गाठण्यासाठी कुठलाही महामंत्र नसतो. मोठी ध्येय ठेवली की यशाकडे जाण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे शिक्षणादरम्यान आयुष्यातील नेमके ध्येय समोर आले पाहिजे, असे मत केंद्र शासनाच्या योजना आयोगाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. १३ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे यंदा ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, बीसीयूडी संचालक डॉ.डी.के.अग्रवाल, कुलसचिव पूरण मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्राची वैचारिक परंपरा तर थोर आहेच. परंतु साहित्य, कला, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्रात राज्याजवळ वैभवशाली ठेवा आहे. मराठी साहित्याने जगाला मौलिक योगदान दिले आहे. तर मराठी चित्रपटांनी तर ‘आॅस्कर’च्या शर्यतीत आपले नाव नोंदविले आहे. युवा पिढीमध्येदेखील हे संस्कार दिसून येत असून सृजनात्मक विचारांतून कलाविष्कार अचंबित करणारा असतो. ‘इंद्रधनुष्य’सारखा हा महोत्सव म्हणजे या नवकलाकारांना प्रोत्साहन देणारा मंचच आहे, असे डॉ.जाधव म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.काणे यांनी विद्यार्थ्यांना सतत क्रियाशील राहण्याचे मार्गदर्शन केले. कलावंताचे डोके कधीच रिकामे नसते. त्यामुळे विचारांना योग्य दिशा देऊन एक आदर्श निर्माण करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
यावेळी डॉ.वासुदेव गाडे, डॉ.मोहन खेडकर यांनीदेखील आपले मत मांडले व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक डी.जी.हुंडीवाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.एस.आर.मुराळे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक शरद पाटील हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अपर्णा येगावकर यांनी केले तर पूरण मेश्राम यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)