कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:05+5:302021-04-09T04:08:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना साथीवर नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच कोविड प्रोटोकॉलची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी व परिणामकारक करण्यावर ...

Special emphasis on contact tracing | कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर द्या

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना साथीवर नियंत्रणासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच कोविड प्रोटोकॉलची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रभावी व परिणामकारक करण्यावर विशेष भर देण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य पथकाकडून करण्यात आली. जिल्ह्यातील कोविड नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना तसेच नागरिकांच्या सहकार्याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन माहिती घेतली.

केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी नागपूर जिल्ह्याची कोरोना साथीची प्रत्यक्ष स्थिती, त्यावरील उपाययोजना, कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आरोग्य सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, गृह अलगीकरणातील रुग्णांसाठी तयार करण्यात आलेला प्रोटोकॉल तसेच लसीकरण मोहीम याबद्दल माहिती घेतली. या केंद्रीय आरोग्य पथकामध्ये दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. हर्षल साळवे, नागपूर एम्सचे प्रो. डॉ. पी. पी. जोशी यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत माहिती घेतली.

कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्नरत आहे. जिल्ह्यात कोविड नियंत्रणासाठी तपासण्यांवर विशेष भर देण्यात आला असून, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. कोविड रुग्णांना आवश्यक औषधोपचार तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना औषधोपचारासोबतच इतरांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आला असून, त्यानुसार याची अंमलबजावणी करण्यात येईल. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय विशेष चमू तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभावी उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली. कोरोना उपाययोजनेंतर्गत कार्यान्वित झालेली डेडिकेटेड कोविड रुग्णालये, विलगीकरण केंद्र, ग्रामीण भागात तसेच नगरपालिका क्षेत्रात तपासणी केंद्र व लसीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता आदीबाबतही या पथकाला माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसोबत केंद्रीय पथकाने चर्चा करुन व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा समन्वयक विवेक इलमे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, अविनाश कातडे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणासाठी विशेष मोहीम

जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी तालुकानिहाय विशेष समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्यामुळे लसीकरणाला चांगला प्रतिसाद ‍मिळत आहे. लसीकरणासंदर्भात ग्रामीण जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करुन नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, यासाठी प्रचार व प्रसिद्धी मोहिमेवर विशेष भर देण्यात आल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला असल्याचेही केंद्रीय आरोग्य पथकाला सांगण्यात आले.

Web Title: Special emphasis on contact tracing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.