लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नागपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे १६ जुलैपासून “माझा हक्क, माझे जात वैधता प्रमाणपत्र” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अर्जांमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित पालक व विद्यार्थ्यांना समितीने संपर्क साधूनही प्रतिसाद न दिल्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य डॉ. मंगेश वानखेडे यांनी दिली.
ज्या विद्यार्थी व पालकांनी १० जुलै २०२५ पर्यंत या कार्यालयाला अर्ज सादर केलेली आहेत त्यांना त्रुटी संदर्भात ई-मेल आलेला आहे अशा सर्व पालक व विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेता येईल. आपल्या समवेत आजोबाच्या टी.सी. चा दाखला, खारीज उतारा तसेच अनुसूचित जाती करिता - १९५०, ओबीसी करिता - १९६७, एसबीसी करिता - १९६७, मराठा करिता १९६७, व्हीजेएनटी करिता - १९६१ पूर्वीचा वास्तव्यासंबंधीचा पुरावा सोबत आणावा तसेच सर्व मूळ कागदपत्रांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा माळा, विंग बी शासकीय आय.टी.आय समोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर-येथे संपर्क साधावा.
अर्जाची सद्यस्थिती ccvis.barti.in या संकेतस्थळावर युझर आयडी व पासवर्ड ने तपासता येईल. 'रिजेक्ट मेसेज आला असल्यास तो अंतिम नाकारलेला नसून फक्त त्रुटी दाखविणारा असतो. अर्ज पेंडींग असेल तर ते प्रक्रियेत आहे. रक्त नातेसंबंधाच्या आधारे जोडलेली जात प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रसिद्ध होतात. १५ दिवसांत आक्षेप न घेतल्यास प्रमाणपत्र निर्गमित होऊ शकते, असेही स्प्ट करण्यात आले आहे.
“सर्व पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी वेळेत दूर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा.”- डॉ. मंगेश वानखेडे, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य