एम्सच्या निर्माण कार्यासाठी जागेचे हस्तांतरण

By Admin | Updated: July 13, 2015 02:28 IST2015-07-13T02:28:44+5:302015-07-13T02:28:44+5:30

मिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभी राहणार आहे.

Space transfer for the construction of AIIMS | एम्सच्या निर्माण कार्यासाठी जागेचे हस्तांतरण

एम्सच्या निर्माण कार्यासाठी जागेचे हस्तांतरण

गोल्फ कोर्सच्या जागेवर होणार एम्स : निर्माण कार्याची जबाबदारी एचएससीसीची
सुमेध वाघमारे / राजीव सिंग नागपूर
मिहानमध्ये ‘गोल्फ कोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभी राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माण कार्यासाठी ही जागा ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ला, (एचएससीसी) हस्तांतरित करण्याच्या तयारीला वेग आला आहे. त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला प्रस्तावित जागेवर पाणी, वीज व चौपदरी रस्ता उपलब्ध करून द्यायचे आहे.
२०१४-१५च्या अर्थसंकल्पात देशात चार नवीन एम्स उभारण्याच्या निर्णयानंतर लगेचच केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये ‘एम्स’ नागपुरात होत असल्याची घोषणा केली. सुरुवातीला हा प्रकल्प मेडिकलच्या टीबी वॉर्डासह, मध्यवर्ती कारागृहामागील जागा, लघु सिंचन विभागाची जागा आणि मेडिकलच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील वैद्यकीय वसाहतीची अशी एकूण साधारण २०० एकर जागेवर उभारण्याचे प्रस्तावित होते. परंतु या जागेवर असलेले विविध विभाग हलविणे खर्चिक आणि वेळखाऊ होते. दरम्यानच्या काळात एम्सच्या अभ्यास मंडळाने मिहानमधील जागेचाही शोध घेतला. मिहान आणि टीबी वॉर्ड असे दोन्ही ठिकाणी एम्सचा विचार सुरू झाला. याला घेऊन १३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव के. सी. सामरीया यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय पथकाने टीबी वॉर्ड व मिहानमधील जागेची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी टीबी वॉर्डाच्या जागेला जागेवरच नापसंती दिली.
अशी मिळाली १५० एकर जागा
मे महिन्यात मुंबईमध्ये ‘एम्स’ व महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) प्रतिनिधींची बैठक झाली. यात मिहानमधील ‘सेझ’ बाहेर सरकारी संस्थांना जमीन देण्यासाठी निविदेची गरज नाही, असा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याआधारे ‘एम्स’ साठी १५० एकर जागा राखीव ठेवण्यात आली. पूर्वी ही जागा गोल्फ कोर्ससाठी ठेवण्यात आली होती.

Web Title: Space transfer for the construction of AIIMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.