‘दक्षिण’ लढविणारच
By Admin | Updated: August 14, 2014 01:25 IST2014-08-14T01:25:03+5:302014-08-14T01:25:03+5:30
शहरातील दक्षिण नागपूर मतदारसंघावर कोणीही दावा केला आणि याबाबत काहीही अफवा पसरविल्या तरी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हक्काचा असून येथे पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढविणार,

‘दक्षिण’ लढविणारच
उमेदवार आयात करणार नाही : संपर्कप्रमुख दीपक सावंत
नागपूर: शहरातील दक्षिण नागपूर मतदारसंघावर कोणीही दावा केला आणि याबाबत काहीही अफवा पसरविल्या तरी हा मतदारसंघ शिवसेनेच्या हक्काचा असून येथे पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढविणार, तो इतर पक्षातून आयात केलेला नसेल, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख डॉ. दीपक सावंत यांनी केले.
वर्धेला भेट देण्यासाठी सावंत बुधवारी सकाळी मुंबईहून विमानाने नागपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्थानिक हॉटेलमध्ये निवडक पत्रकारांशी संवाद साधला. दक्षिण नागपूरवर भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच दावा केला आहे. त्यानंतर महायुतीतील दुसरा घटक पक्ष शिवसंग्रामचाही या मतदारसंघावर डोळा आहे. याकडे सावंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कोणीही दावा केला तरी ‘दक्षिण’ शिवसेनाच लढविणार. याबाबत पक्षप्रमुखांसह इतरही नेत्यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात बदल होणार नाही. महायुतीतील इतर घटक पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघावर दावा करू शकतात. पण आम्ही आमचे मतदारसंघ सोडणार नाही, उलट नागपूरमध्ये आणखी एका मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी, अशी शिवसैनिकांची मागणी आहे व ती पक्षप्रमुखांकडे मांडणार आहे.
सावंत यांनी स. ११ वा. रेशीमबागेतील सेना भवनात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीतही दक्षिण नागपूरची जागा जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी संपूर्ण शक्ती पणाला लावण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांची मतेही जाणून घेतली. तत्पूर्वी दिवंगत आरती बोरकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.(प्रतिनिधी)
पक्षनिष्ठा, निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी
उमेदवाराची पक्षनिष्ठा आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवार निश्चित केले जातील. अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सावंत यांनी स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा केली. या वेळीही त्यांनी उमेदवारीचे निकष काय असतील याची माहिती दिली. एकदा उमेदवार ठरल्यावर इतरांनी त्याला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचनाही केली. या वेळी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे उपस्थित होते. इकडे दक्षिणच्या उमेदवारीसाठी शेखर सावरबांधे, किरण पांडव , किशोर कन्हेरे आणि किशोर कुमेरिया यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
निवडणुकीनंतर संघटनात्मक बदल
विधानसभेची निवडणूक झाल्यावर नागपूर जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक बदल केले जातील. सध्या याबाबत काहीही विचार नाही, असे सावंत यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी संघटनेत फेरबदल होणार असल्याची चर्चा सेनेत होती हे येथे उल्लेखनीय.