काँग्रेसचा बालेकिल्ला दक्षिणही ढासळला
By Admin | Updated: October 20, 2014 00:36 IST2014-10-20T00:36:08+5:302014-10-20T00:36:08+5:30
दक्षिण नागपूर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. प्रचारादरम्यान तगडे वाटणारे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी

काँग्रेसचा बालेकिल्ला दक्षिणही ढासळला
नागपूर : दक्षिण नागपूर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप लाटेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. प्रचारादरम्यान तगडे वाटणारे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी बाजी मारली आहे.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा ३० हजाराहून अधिक मतांनी विजय झाला होता. यावेळीही काँग्रेस बाजी मारेल म्हणून मागील निवडणुकीत पूर्व नागपूर मतदार संघात पराभूत झालेले चतुर्वेदी यांनी हनुमान उडी घेत दक्षिण मतदार संघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केली. चतुर्वेदी तयारीनिशी निवडणुकीत उतरल्याने या मतदारसंघात चमत्कार घडवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु मतदारांनी त्यांना नाकारले. कोहळे यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांनी चतुर्वेदी यांचा ४३२१४ मतांनी पराभव केला. झालेल्या १,८३२६३ मतदानापैकी कोहळेंना ८१,२२४ तर चतुर्वेदींना ३८०१० मते पडली. बसपाच्या सत्यभामा लोखंडे तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांना २३,१५६ मते मिळाली.
शिवसेनेचे किरण पांडव व शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघात पंचरंगी लढत होईल, असा अंदाज होता. परंतु सावरबांधे व पांडव लढतीतच नव्हते. पांडव यांना १३,८६३ तर सावरबांधे यांना १५,१०७ मते मिळाली. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने दीनानाथ पडोळे यांनी घड्याळचा गजर केला. परंतु त्यांच्या घड्याळीचे काटे ४१९४ मतांवर थांबले. सीताबर्डी येथील बचत भवनात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत सुधाकर कोहळे यांनी २५२८ मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ३४१०, तिसऱ्या फेरीत ३३८१, चौथ्या फेरीत ४१०३, पाचव्या फेरीत १५५५ मतांची आघाडी मिळाल्याने या फेरीअखेरीस कोहळे यांची एकूण १४,९७७ मतांची आघाडी झाली होती. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत कोहळेंना आघाडी मिळत गेली. अखेरच्या १७ व्या फेरीअखेर कोहळे यांनी ४३२१४ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. या मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात होते. यातील अजित भाकरे, डॉ. यशवंत आंबटकर व राजू डबले यांना मतांची शंभरी पार करता आली नाही. चार उमेदवारांना दोनशेचा पल्ला गाठता आलेला नाही. यात वैभव पांडव, जीवन रामटेके, नामदेवराव कवडू व अब्दुल राजीक पटेल आदींचा समावेश आहे.बिंबिसार कांबळे यांना ३८३, सतीश शेंडे ३५१, अॅड. सुनील लाचेरवार ८४२ तर क्षितिज कांबळे यांना ५२५ मते मिळाली. डेमोक्रेटीक सेक्युलर पार्टीचे शकील पटेल यांना ३४०० मते मिळाली. (प्रतिनिधी)