भुकेले जीव अन् रुग्णांसाठी माणुसकीचा झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST2021-05-25T04:07:53+5:302021-05-25T04:07:53+5:30
नागपूर : स्वत:साठी सगळेच जगतात, परंतु भुकेल्या व्यक्तीच्या पोटात दोन घास जावेत यासाठी धडपड करतो, तो खरा माणूस. कोरोनामुळे ...

भुकेले जीव अन् रुग्णांसाठी माणुसकीचा झरा
नागपूर : स्वत:साठी सगळेच जगतात, परंतु भुकेल्या व्यक्तीच्या पोटात दोन घास जावेत यासाठी धडपड करतो, तो खरा माणूस. कोरोनामुळे आधीच नागरिकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे त्यांना दोनवेळच्या भोजनासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत खुशरू पोचा या देवदूताने गरजू नागरिकांना राशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.
खुशरू पोचा हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मुख्य कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. सेवा किचन या संस्थेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून ते समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या संस्थेची कुठेही नोंदणी झालेली नाही. समाजकार्य करताना ते कधीच कुणाकडून आर्थिक मदत घेत नाहीत. समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीवर ते गरजू नागरिकांना मदत करतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाल्यानंतर अनेकांचा रोजगार हिरावला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा बिकट परिस्थितीत खुशरू पोचा यांनी गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. सातत्याने नागरिकांना भोजन, राशन कीट पुरविल्या. कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाही त्यांचे कार्य थांबलेले नाही. नागपूरच नव्हे, तर ग्रामीण भागातही त्यांचे सेवाकार्य सुरू आहे. नुकतेच त्यांनी कोरोना रुग्णांसाठी मेळघाटमध्ये ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे २ असे ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले आहेत. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी १५ किलोच्या राशन कीट तयार केल्या आहेत. त्यात आटा, तांदुळ, दाळ, चहा, मसाले, लोणचे, तेल आदी वस्तूंचा समावेश आहे. अशा २५०० कीट त्यांनी पांढरकवडा येथे पाठविल्या आहेत, तर गुजरातच्या अमरेली गावात ५०० कीट, कोकणातील मालवण येथे २०० कीट पाठवून गरिबांच्या चुली पेटविण्यास मदत केली आहे. नागपुरातही पॉझिटिव्ह असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते दोनवेळचे भोजन पुरवित आहेत. तसेच मेडिकलमध्ये दररोज १०० रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था ते करीत आहेत. त्यांच्याकडून होत असलेल्या समाजकार्यामुळे समाजातील गरजू, भुकेल्या नागरिकांना तसेच कोरोनामुळे आजारी असलेल्या रुग्णांना मोलाची मदत होत आहे. समाजाप्रती आपलीही काही जबाबदारी आहे, ही भावना जोपासून त्यांचे मदतकार्य अव्याहतपणे सुरू आहे. त्यांचे हे मदतकार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
.............
देशातील २० रुग्णालयांत मदत
खुशरू पोचा हे सेवा किचनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून देशातील २० हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना भोजन पुरवित आहेत. यात हैदराबाद, बंगळुरू, नवा रायपूर, नवी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली आणि नागपूर येथील रुग्णालयांचा समावेश आहे. त्यांच्या या मदतीमुळे गरीब रुग्णांच मदत होत आहे.
कुलींना जगण्यासाठी आधार
लॉकडाऊन झाल्यामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. या काळात कुलींचा रोजगार बुडाला होता. खुशरु पोचा यांनी या काळात कुलींना महिनाभराचे राशन देऊन जगण्यासाठी आधार दिला. आता रेल्वेगाड्या सुरू झाल्या, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी कुलींना काम देण्याचे टाळत आहेत. त्यामुळे कुलींसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. अशा कठीण परिस्थितीत खुशरू पोचा हे सध्या कुलींना महिनाभराचे राशन पुरविण्याचे काम करीत आहेत.
..........