लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जळगाव-भुसावळ मार्गावर बिहारच्या एका मजूर जोडप्यासोबत ट्रकमध्ये घडलेला प्रसंग पहिला आणि त्यांच्या मनात प्रचंड दहशत पसरली. नागपूरला पोहचल्यावर यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या गावी पायी जाऊ पण ट्रकमध्ये नाही, ही त्यांची भावना. एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भीती ओळखली. पोलिसांच्या मदतीने माणुसकीचा मार्ग उभा करीत स्वत:च्या गाडीने त्यांना त्यांच्या गावी पोहचविले. सुखरूप घरी पोहचताच त्या जोडप्याच्या अश्रूंचा बांध फुटला आणि त्यांनी माणुसकीला हात जोडले.वणी तालुक्यातील मुकुटबन येथील रहिवासी नितीन दीपे व पत्नी रंजना या मजूर जोडप्याची ही गोष्ट. नितीन व रंजना जळगाव येथील इलेक्ट्रॉनिक सामान बनविणाऱ्या कंपनीत कामाला होते. दोन महिन्यात त्यांचे जवळचे पैसे संपले. ४०० रुपयात मोबाईल विकला आणि घरमालकाला विनंती करीत गावच्या रस्त्याने लागले. रस्त्यावर बिहार, झारखंड व विविध शहरात जाणारे १०० मजूर होतेच. एकमेकांच्या आधाराने सर्व पायी निघाले. ट्रक थांबविण्याचा प्रयत्न करायचा आणि चालत राहायचे. अशात एक ट्रक थांबला. पत्नी केबिनमध्ये आणि पुरुष मागे बसण्यास सांगितल्याने नितीनने बसण्यास नकार दिला. पुढे जाऊन याच ट्रकचालकाने ट्रकमध्ये बसलेल्या एका मजूर महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची बाब त्यांना कळाली.ट्रकमध्ये बसलो असतो तर हा प्रसंग आपल्यासोबत घडला असता या एका विचाराने त्यांच्यामध्ये भीती पसरली. ते तसेच पायी चालत जळगाव बस स्टँडवर आले. सुदैवाने थेट नागपूरला लागलेली बस मिळाली आणि एकही पैसा न देता ते रात्री २ वाजता पांजरी नाक्यावर पोहचले. संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी या घाबरलेल्या दाम्पत्याची माहिती घेतली व स्वत:च्या गाडीने मुकुटबनपर्यंत सोडण्याची तयारी केली. डीसीपी नीलेश भरणे यांनीही कागदपत्रांसह परवानगी मिळवून दिली आणि स्वत: डिझेलची व्यवस्था करीत त्या जोडप्याला रवाना केले.