नागपूर जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्तांना लवकरच मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 10:02 AM2018-04-23T10:02:15+5:302018-04-23T10:02:23+5:30

नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोंडअळी संदर्भातील मदत लवकरच देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

Soon help to farmers in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्तांना लवकरच मदत

नागपूर जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्तांना लवकरच मदत

googlenewsNext
ठळक मुद्देकृषिमंत्री फुंडकर : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोंडअळी संदर्भातील आदेश चुकीचा काढण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोंडअळी संदर्भातील मदत लवकरच देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात नागपूर जिल्ह्यातील सन २०१७-१८ कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजनाचा आढावा कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेबर बावनकुळे, डॉ. आशिष देशमुख, सुधीर पारवे, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सादरीकरण केले.
फूंडकर म्हणाले, बीटी कापसावर मागील खरीप हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापला. त्यानंतर शासनाने मदत देण्याचे जाहीर केले होते. कृषी व महसूल यंत्रणेकडून संयुक्त सर्वेक्षणही करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील ८ तालुक्यात १ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या ६९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र यात नागपूर जिल्ह्यातील मौदा, काटोल,नरखेड, रामटेक आणि कळमेश्वर या पाच तालुक्यात नुकसान झाले नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. कृषिमंत्री पांडुरंग फुं डकर यांनी रविवारी खरीप हंगामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बीटी कापसासंदर्भात यंदा ठोस पावले उचलण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहे. बोंडअळी संदर्भातील मदतीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. यानुसार वगळण्यात आलेल्या सर्व जिल्ह्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निधी देण्यास उशीर झाला असला तरी लवकरात लवकर तो शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना बियाणे व खते उपलब्ध करून द्या
मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्यामुळे शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देत असतानाच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते तसेच पीककर्ज वेळेवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश फुंडकर यांनी दिले.

जमीन आरोग्यपत्रिका वितरित करा
खरीप हंगामाचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात कृषी सहायक व कृषितज्ञ यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करुन पीकपद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरु केलेला उपक्रम विदर्भातील सर्व जिल्ह्यात १ मे ते ३० मे पर्यंत राबविण्याच्या सूचना कृषिमंत्री फुंडकर यांनी केल्या.

बोगस बियाण्यांबाबत सतर्क राहा
निकृष्ट व बोगस बियाणासंदर्भात सतर्क राहून अशा बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्या. जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर भरारी पथके सज्ज ठेवा. ग्रामसभेत सुद्धा अशा बियाणापासून सतर्क राहण्याचा सूचना प्रत्येक शेतकऱ्यांना करा. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली निकृष्ट बीटी बियाणे तसेच इतर बियाणे अथवा खरीप हंगामाबाबत अडचणी असल्यास त्याची माहिती जिल्हास्तरावर तात्काळ दखल घेऊन सोडविण्यात याव्यात, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

असे आहे खरीपचे नियोजन
नागपूर जिल्ह्यात पीक लागवडीखाली ५ लक्ष ९३ हजार ८०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ९१ हजार ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. सर्वसाधारण क्षेत्रापैकी ४ लाख ८० हजार ७५६ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी तर १ लाख ६४ हजार ५७२ हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामाखाली आहे. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत ७८.९१ टक्के पाऊस पडल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
खरीप हंगामामध्ये खरीप भात ९४ हजार २०० हेक्टर, खरीप ज्वारी ८ हजार हेक्टर, तूर ६ हजार ५०० हेक्टर, सोयाबिन १ लाख हेक्टर तर कापूस २२ हजार ५०० हेक्टर प्रस्तावित आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीन व कापसाच्या क्षेत्रात थोड्या प्रमाणात घट आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे महाबीजकडुन २९५४२ क्विंटल तर खासगी कंपन्यांनकडून ५६६६२ क्विंटल असे एकूण ८६२०४ क्विंटल उपलब्ध होणार आहे.
यामध्ये सोयाबीन-५६२५० क्विंटल, भात १८८४० क्विंटल, कापूस ५०६३ क्विंटल, तूर ३१२० क्विंटल, भुईमुंग १०८९ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून त्यानुसार बियाणे उपलब्ध आहेत. तसेच १ लाख ४१ हजार ७४० मेट्रिक टन खतांची आवश्यकता असून त्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले.

Web Title: Soon help to farmers in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.