मुलाने केला वडिलांचा खून
By Admin | Updated: March 23, 2015 02:13 IST2015-03-23T02:13:16+5:302015-03-23T02:13:16+5:30
दारूच्या नशेत वडिलांकडून होणारी मारहाण आणि शिवीगाळ असह्य झाल्यामुळे मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केला.

मुलाने केला वडिलांचा खून
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांकडून होणारी मारहाण आणि शिवीगाळ असह्य झाल्यामुळे मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केला. वेकोलिच्या कोयला विहार कॉलनीत शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. प्रोसेनजित नेहारंजन बिसवास (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते वेकोलित वाहनचालक म्हणून कार्यरत होते. ए-५ क्वॉर्टरमध्ये ते राहायचे. त्यांची पत्नी संगीता चंद्रपूरला राहते. मुलगा (आरोपी) अक्षय (वय २१) दहावी नापास आहे. तो मोबाईल रिपेरिंगचे काम करायचा. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्याने काम सोडले. तो दिवसभर रिकामा फिरायचा. त्यामुळे वडील प्रोसेनजित त्याच्यावर चिडायचे. दारूच्या नशेत नेहमी मारहाण, शिवीगाळ करायचे. त्यामुळे अक्षय त्रस्त झाला होता. अलीकडे तोसुद्धा दारू पीत होता.
शनिवारी रात्री ९ च्या सुमारास प्रोसेनजित दारू पिऊन अक्षयला शिवीगाळ करू लागले. ते टोचून बोलत होते. त्यात त्यांनी अक्षयला घराबाहेर काढून दिले. त्यामुळे बापलेकातील वाद वाढतच गेला. रागाच्या भरात आरोपीने धारदार चाकूने वडिलांच्या मानेवर, छातीवर सपासप वार केले.
प्रोसेनजित रक्ताच्या थारोळ्यात कोसळून तडफडू लागले. ते पाहून शेजाऱ्याच्या मदतीने अक्षयने त्यांना गिट्टीखदानमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची स्थिती नाजूक असल्याचे पाहून डॉक्टरने त्याला मेयोत नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोपीने प्रोसेनजितला मेयोत नेले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, मुलाने वडिलांचा खून केल्याच्या वार्तेने कोयला विहार कॉलनीत प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी आरोपी अक्षयला काही वेळेतच ताब्यात घेतले.
त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करुन त्याचा दोन दिवसाचा पीसीआर मिळवला. एपीआय पाटील, ज्ञानेश भेदोडकर पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)