शिक्षकाचा मुलगा झाला आरबीआयचा व्यवस्थापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:06 IST2019-07-26T12:03:29+5:302019-07-26T12:06:53+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी सुरक्षित ठेवणारी यंत्रणा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) होय. या यंत्रणेचा भाग होऊन अर्थकारणाचा गाडा हाकण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते आणि अखेर तो यशस्वीही झाला. अभिषेक सयाम असे या तरुणाचे नाव.

शिक्षकाचा मुलगा झाला आरबीआयचा व्यवस्थापक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी सुरक्षित ठेवणारी यंत्रणा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) होय. या यंत्रणेचा भाग होऊन अर्थकारणाचा गाडा हाकण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले होते आणि अखेर तो यशस्वीही झाला. अभिषेक सयाम असे या तरुणाचे नाव. आरबीआयच्या व्यवस्थापक पदावर नुकतीच त्यांची नियुक्ती झाली आहे. देशभरातील अडीच लाख परीक्षार्थ्यांपैकी केवळ १२७ परीक्षार्थी यशस्वी ठरले असून, त्यात अभिषेक यांचा सहभाग आहे व नागपूर जिल्ह्यातून ते एकमेव उमेदवार ठरले आहेत.
अभिषेक यांचे वडील सुखदेवराव सयाम हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, आई गृहिणी आहे. त्यांना अर्थशास्त्र विषयाची आवड होती आणि आरबीआयमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न मनात होते. मात्र तिथे पोहचावे कसे, याबाबत कल्पना नव्हती. सोमलवार निकालसमधून दहावी आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये नंबर लागला. ही पदवीही त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.
पुढे दिल्ली विद्यापीठातून मास्टर्स डिग्रीसाठी प्रवेश घेतला. दिल्लीत गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना आरबीआयच्या व्यवस्थापक (मॅनेजर) पदाच्या परीक्षेबाबत माहिती मिळाली. बालपणापासून जे स्वप्न मनात होतं, ते पूर्ण करण्याची दिशा त्यांना प्राप्त झाली आणि लागलीच याची तयारीही सुरू केली.
२०१७ मध्ये मास्टर्स पूर्ण केल्यानंतर ते जोमाने या परीक्षेच्या तयारीत लागले. अर्थातच कोणतेही क्लासेस लावण्याऐवजी आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध सिलॅबस आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावरच त्यांचा हा अभ्यास सुरू होता. अखेर प्रयत्नांचे चीज झाले. ऑगस्ट २०१८ मध्ये प्राथमिक व सप्टेंबर २०१८ मध्ये मुख्य परीक्षा ते सहज उत्तीर्ण झाले व पुढे मुलाखतीमध्येही त्यांनी यश मिळविले. या परीक्षेला अडीच लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २००० विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेला निवड झाली व नंतर मुलाखतीसाठी ६०० उमेदवार पात्र ठरले. विभागनिहाय मुलाखतीमध्ये निवड झालेल्या १२७ उमेदवारांमध्ये अभिषेक सयाम यांचाही समावेश आहे. येत्या २९ जुलै रोजी अभिषेक १० आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी चेन्नईला रवाना होणार आहेत. व्यवस्थापक पदासाठी महाराष्ट्रातून केवळ १९ उमेदवारांची निवड झाली आहे, त्यात नागपूरचे अभिषेक व एका चंद्रपूरच्या उमेदवाराचा समावेश आहे. यातून सयाम यांची नियुक्ती ही प्रेरणादायी बाब आहे.
ध्येयाची कल्पना करीत राहा, यश मिळतेच
आपल्याकडे बँकिंग क्षेत्राबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, मात्र आरबीआयच्या अधिकारी पदांच्या परीक्षांबाबत फारशी जनजागृती नाही. ही अवस्था अभिषेक यांनी अनुभवली आहे. आरबीआयच्या ग्रेड बी म्हणजे व्यवस्थापक पदाची परीक्षा आणि क्लरिकल पदाची परीक्षा होते. व्यवस्थापक पदाची परीक्षा ही यूपीएससी स्तराची असते. आवड होती पण दिशा नव्हती, जी दिल्लीला गेल्यावरच मिळाल्याचे अभिषेक सांगतात. आवड आणि ध्येय एकसमान झाले तर यशाची दिशा सापडते. ठरविलेल्या निश्चित ध्येयाची नेहमी कल्पना करीत राहिलो तर त्यानुसार बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकसित होत असते व त्यातूनच यश मिळते, असा विश्वास सयाम यांनी व्यक्त केला.