कधी लिंक फेल तर कधी सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST2021-03-20T04:09:13+5:302021-03-20T04:09:13+5:30

उमरेड/मकरधोकडा : दररोज सकाळी १० वाजता गावखेड्यातील शेतकरी, शेतमजूर आणि अन्य ग्राहक बँकेत रकमेची उचल वा रकमेचा भरणा करण्यासाठी ...

Sometimes the link fails and sometimes the server goes down | कधी लिंक फेल तर कधी सर्व्हर डाऊन

कधी लिंक फेल तर कधी सर्व्हर डाऊन

उमरेड/मकरधोकडा : दररोज सकाळी १० वाजता गावखेड्यातील शेतकरी, शेतमजूर आणि अन्य ग्राहक बँकेत रकमेची उचल वा रकमेचा भरणा करण्यासाठी येतात. अशातच कधी लिंक फेल तर कधी सर्व्हर डाऊन असल्याच्या कारणावरून त्यांना कधी दोन तास तर कधी दिवसभर ताटकळत राहावे लागते. बरेचदा तर दिवसभर बँकेत बसूनही कामच होत नाही, अशा विचित्र परिस्थितीचा सामना मकरधोकडा येथील युनियन बँकेच्या ग्राहकांना करावा लागत आहे. वर्षभरापासून हीच परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याने बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहक त्रासले आहेत.

उमरेड तालुक्यातील मकरधोकडा या गावात १९८२ पासून युनियन बँकेची शाखा आहे. सदर बँकेत परिसरातील सुमारे १७ गावांमधील नागरिकांची खाती आहेत. उमरेडपासून १४ किलोमीटर अंतरावरील या गावात एकमेव बँक असून बुटीबोरीपर्यंत अन्य बँक परिसरात नाही. यामुळेच सदर बँकेची ग्राहकसंख्या १४ हजाराच्या आसपास आहे. शिवाय ८ ते १० हजार ग्राहक नियमित असल्याने बँकेची उलाढाल मोठी आहे.

मोठी आर्थिक उलाढाल असूनही सदर बँकेच्या लिंक फेल आणि सर्व्हर डाऊन असल्याच्या समस्येमुळे नागरिकांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. एकीकडे ‘डिजिटल’ व्यवहारावर सरकारचा भर असताना येथे दररोज शेकडो ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. बँकेची वेळ सकाळी १० वाजताची असून बरेचदा कर्मचारी उशिराने येत असल्याचीही बाब बोलली जात आहे. मागील काही दिवसापासून यूपीएस जळाल्याच्या कारणावरूनही नागरिकांना परतीची वाट धरावी लागत आहे. विभागीय कार्यालयाने या संपूर्ण समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

बाहेरगावातील नागरिक

मकरधोकडा या गावासह शिरपूर, पिपरडोल, देवरी, आमदाव, तांबेखनी, मोरझडी, भिवगड, खैरी, जांभळापाणी, खापरी, जामगड, सिंदीविहिरी, डव्हा, फुकेश्वर, सायकी, पारडगाव, पादरीठाणा आदी गावांमधील सुमारे ५ ते ७ किलोमीटर अंतरावरील नागरिक सदर बँकेत येत असतात. अशातच वर्षभरापासून तांत्रिक अडचणींमुळे नागरिक चांगलेच त्रासले आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांची आहे.

-

तांत्रिक बाबींमुळे ग्राहकांना त्रास होत आहे, ही बाब खरी आहे. याबाबत अनेकदा नागपूर येथे विभागीय कार्यालयाकडे कळविले आहे. तांत्रिक बाब आमच्या हातात नाही. बँकेतील कर्मचारी नियमित वेळेवर उपस्थित असतात. लवकरच यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रफुल खोंड

व्यवस्थापक, युनियन बँक, मकरधोकडा

Web Title: Sometimes the link fails and sometimes the server goes down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.