नागपूर : लहान लहान हातांनी तयार केलेले सुतळीपासून वॉलपीस, पायदान, कुंदनची फुले पाहून सर्वच जण मोहित झाली होती. एवढेच नाही तर योगा, प्राणायाम, व्यक्तिमत्त्व विकास, ड्रॉर्इंग, इंग्लिश स्पीकिंग आणि हसतखेळत गणितही ही मुले शिकली. निमित्त होते लोकमत बाल विकास मंचच्या समर कॅम्पच्या समारोपाचे. मुलांच्या आवडीचे शिबिर आणि उन्हाळ्ी सुट्यांची मजा घेण्यासाठी लोकमत बाल विकास मंचच्यावतीने मेजर हेमंत जकाते विद्या निकेतन आणि लोकमत भवन या दोन ठिकाणी १५ दिवसीय ‘समर कॅम्प’चे आयोजन केले होते. या कॅम्पमध्ये शिकविण्यात आलेल्या विविध कलांचे समारोपाप्रसंगी प्रदर्शन भरविण्यात आले होते. मेजर हेमंत जकाते विद्या निकेतनमध्ये हा कॅम्प २४ एप्रिल ते १० मे दरम्यान घेण्यात आला. याचा समारोप आज शनिवारी सुलभा हेमंत जकाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली फटिंग, प्राचार्य मधुसूदन मुडे, शीला मुडे आदी उपस्थित होते. शिबिरात शिकविण्यात आलेले विशेषत: इंग्रजी आणि गणितांची उजळणी करावी, ड्रॉर्इंग आणि क्राफ्टचा सराव करावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. शिबिराच्या आयोजनासाठी अमर जयपूरकर, मोहन तलवार, नंदा आस्कर, पौर्णिमा सहारे, देवीदास भोंडे, राकेश शेंडे, राजेश शिंदे आदींनी सहकार्य केले. लोकमत भवनमध्ये १५ ते ३० एप्रिल या दरम्यान समर कॅम्प घेण्यात आला होता. याच्या समारोपावेळी प्रा. महादेव गायधने, मंगेश खापरे, मिलिंद पटवर्धन, जया गुप्ता, कविता, दीपक आदी उपस्थित होते. या दोन्ही कॅम्पमध्ये विशेषत: सिरॅमिक पॉट, सुतळीपासून वॉलपीस आणि पायदान, कुंदनची फुले आणि इतर सजावटीचे साहित्य, रांगोळीचे विविध प्रकार, स्टॉकिंग ट्युशूचे, आॅर्गेन्डीची फुले आणि सिडी आर्ट वर्क शिकविण्यात आले. बाल विकास मंच संयोजिका अनुश्री बक्षी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या दोन्ही कॅम्पला बालगोपालांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)
कोणी पायदान तर कोणी केली कुंदनाची फुले
By admin | Updated: May 11, 2014 01:27 IST